बीड: पोलिसांनी परवानगी नाकारूनही बीडमध्ये मोर्चा काढल्याबद्दल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) आणि नरेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांसह तब्बल अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Police filed complaint against Vinayak Mete for organizing maratha morcha in beed)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विनायक मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. 2014 ला सुद्धा जे आरक्षण दिलं ते ही चुकीचं दिलं, त्याची फळं आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होतं. पण या माणसाच्या मुर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं, असा घणाघाती आरोपही मेटे यांनी यावेळी केलाय. इतकच नाही तर मराठा आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या. त्यासाठी 5 जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर 7 जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला होता.
मराठा समाजाला EWS (आर्थिक दुर्बल घटक) आरक्षणाचा निर्णयही आपण मराठा मोर्चा जाहीर केल्यावर घेतला गेला. त्यासाठी मी कोर्टात गेल्यानंतर सरकारनं आपल्याला EWS आरक्षण दिलं. त्यामुळे या सरकारला लाथा घातल्याशिवाय यांना जाग येत नाही हे आता सिद्ध झालंय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला लाथा घालण्यासाठी आता पुढे या असं आवाहनही मेटे यांनी केलंय. ही फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहील. मराठा समाजातील आमदारांना जर चाड असेल तर ते या आंदोलनाच्या मागे उभा राहतील, असं आवाहनही मेटे यांनी केलंय.
संबंधित बातम्या :
Maratha Morcha : कितीही हजारांचा पोलीस बंदोबस्त असू दे, मराठा मोर्चा निघणारच; विनायक मेटेंचा निर्धार
बीडमधील मराठा मोर्चाला प्रशासनाची परवानगी नाही; मोर्चा निघणारच, विनायक मेटे ठाम
(Police filed complaint against Vinayak Mete for organizing maratha morcha in beed)