पंढरीच्या वारीत चोरांची टोळी, 7 महिलांसह 21 भामटे जेरबंद, पंढरपूर पोलिसांची मोठी कारवाई!
चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणांवर पोलिसांची अशी पाच पथकं तैनात करण्यात आली होती. त्यामुळे गर्दीत वारकऱ्याचा खिसा साफ करणाऱ्या, मोबाइल व महिलांची पर्स लंपास करणाऱ्या तब्बल 21 चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले.
पंढरपूरः कार्तिक एकादशीच्या निमित्ताने सोमवारी पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी (Pandharpur Yatra) विठ्ठलाचे दर्शन घेतले. कार्तिक यात्रेनिमित्त शहरात आलेल्या भाविकांमध्ये (Kartiki Yatra) अनेक हौशे, नवशे गवशे येतात. यात काही चोरट्यांचाही समावेश असतो. या चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी यात्रेच्या परिसरात पोलिसांचे (Pandharpur Police) गस्त पथक तैनात असते. काल पंढरपूरमध्ये याच पथकातील पोलिसांनी मोठी कारवाई करत यात्रेतील भाविकांच्या सामानाची चोरी करणाऱ्या तब्बल 21 भामट्यांना रंगेहाथ पकडले.
चोरट्यांना पकडण्यासाठी वारकऱ्याचा वेश
पंढरीच्या वारीत येणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी पंढरपूर पोलिसांनी खास युक्ती आखली होती. यावेळी पोलिसांनी वारकऱ्याचा वेश घेऊन वारीदरम्यान गस्त घातली. चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणांवर पोलिसांची अशी पाच पथकं तैनात करण्यात आली होती. त्यामुळे गर्दीत वारकऱ्याचा खिसा साफ करणाऱ्या, मोबाइल व महिलांची पर्स लंपास करणाऱ्या तब्बल 21 चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले.
7 महिला व 14 पुरुष भामटे गजाआड
पोलिसांनी कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रभागा नदी, संत नामदेव पायरी, प्रदक्षिणा मार्ग आदी गर्दीच्या ठिकाणी वारकऱ्याच्या वेशात गस्त घातली. या कारवाईत पोलिसांनी 14 पुरुष आणि 7 महिला चोरांना पकडले. चोरांकडून पोलिसांनी दोन मोबाइल आणि काही रोख रक्कम हस्तगत केली आहे. तसेच या चोरट्यांकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान वारीत ज्यांच्या वस्तू, साहित्य, पैसे चोरीला गेले आहेत, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगदुम यांनी केले आहे.
इतर बातम्या-