“या” खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही…,पोलीस अधिकाऱ्याच्या पोस्टनंतर खळबळ
Bajrang Sonwane Ganesh Munde: बीडमधील पत्रकारांसाठी पोलीस अधीक्षकांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आहेत. त्यांनी त्यावर पोस्ट करताना म्हटले की, मी पत्रकार परिषद घेतली तर या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, अशा आशयाची पोस्ट केली आहे.
Bajrang Sonwane Ganesh Munde: मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकारण होऊ लागले आहे. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दुसरीकडे पोलिसांची चौकशी सुरु आहे. त्यातही धक्कादायक खुलासे होत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे करत आहेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी बीड खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यात त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे यांच्यावर आरोप केले होते. त्याचमुळे गणेश मुंडे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्या पोस्टनंतर त्यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहे.
गणेश मुंडे यांची पोस्ट काय?
बीडमधील पत्रकारांसाठी पोलीस अधीक्षकांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आहेत. त्यांनी त्यावर पोस्ट करताना म्हटले की, मी पत्रकार परिषद घेतली तर या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, अशा आशयाची पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांना खासदाराचे नाव घेतले नाही. त्यानंतर पत्रकारांनी समजनेवाले को इशारा कॉफी होता है, असे म्हणत बजरंग सोनवणे यांच्याकडे बोट दाखवले आहे.
मुंडे यांना ग्रुपमधून काढले
गणेश मुंडे यांच्या या पोस्टमुळे पोलीस दल आणि राजकारण्यांत एकच खळबळ उडाली आहे. ही पोस्ट केल्यानंतर मुंडे यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी गणेश मुंडे या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. आता मुंडे यांनी अशी वादग्रस्त पोस्ट केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बजरंग सोनवणे यांची काय होती पोस्ट
बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांवर आरोप केले होते. त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे या अधिकार्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती. त्या कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट होतील, अशी चर्चा रंगली होती.