शिवसेना शिंदे गटातील आतली बातमी, दोन मोठ्या नेत्यांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
शिवसेना पक्षातच भावना गवळी आणि संजय राठोडांमधला अंतर्गत वाद वाशिम-यवतमाळ जिल्ह्यात लपून राहिलेला नाही. त्याचीच झलक आता पुन्हा सुरु झालीय. भावना गवळी सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. आता पुन्हा त्यांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचे मंत्री संजय राठोडही स्पर्धेत आहेत.

वाशिम | 5 मार्च 2024 : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच रस्सीखेच आहे. विद्यमान खासदार भावना गवळी यांनी माझीच उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचंदेखील नाव चर्चेत आहे. संजय राठोड खासदारकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भावना गवळी यांनी संजय राठोड यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “संभ्रम निर्माण करणाऱ्यांना पक्ष महत्त्व देणार नाही”, असा टोला भावना गवळी यांनी लगावला आहे. वाशिम-यवतमाळ मतदारसंघातून आपल्या उमेदवारीचा दावा करण्यासोबतच भावना गवळींनी हा टोला मंत्री संजय राठोडांना लगावलाय. “लोकसभेची माझी उमेदवारी निश्चित असून कोणताही संभ्रम नाही आणि ज्यांनी संभ्रम निर्माण केला त्यांच्या बोलण्याला पक्ष महत्व देणार नाही”, असं भावना गवळी स्पष्ट शब्दांत म्हणाल्या आहेत.
शिवसेना पक्षातच भावना गवळी आणि संजय राठोडांमधला अंतर्गत वाद वाशिम-यवतमाळ जिल्ह्यात लपून राहिलेला नाही. त्याचीच झलक आता पुन्हा सुरु झालीय. भावना गवळी सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. आता पुन्हा त्यांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचे मंत्री संजय राठोडही स्पर्धेत आहेत. मी असो की आणखी दुसरा उमेदवार, पक्ष नेतृत्व ज्याला संधी देईल तो लढेल, असं 2 दिवसांआधीच राठोड म्हणाले होते. तर शिंदेंसोबत गेली तेव्हाच पुन्हा तिकीट देण्याचा वायदा झाल्याचं भावना गवळी म्हणाल्या आहेत.
उमेदवार कुणीही असला तरी सामना शिवसेनेशीच
भावना गवळींना तिकीट मिळो की मग संजय राठोड. जर भाजपला जागा सुटलीच तरी महायुतीच्या उमेदवाराचा सामना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशीच होईल आणि ठाकरे गटाकडून संजय देशमुखांचं नाव निश्चित झाल्याचं बोललं जातंय. गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संजय देशमुखांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. तेव्हा त्यांची उमेदवारी निश्चित झाली होती अशी चर्चा आहे, माजी राज्यमंत्री राहिलेले देशमुख राठोडांचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळं वाशिम-यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी किंवा संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुख अशी लढत होण्याची शक्यता आहे
कुणाला संधी मिळेल? लवकरच स्पष्ट होणार
लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाशिममध्ये आणून भावना गवळींनी शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे. शेतकरी प्रशिक्षण भवनाचं लोकार्पण आणि वाशिमच्या अकोला नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी, भावना गवळींच्या पुन्हा उमेदवारीवरुन किंवा विजयावरुन थेट भाष्य केलं नाही. मात्र महायुतीचाच भगवा फडकणार असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान, एक दोन दिवसांत महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर वाशिम-यवतमाळमधून पुन्हा भावना गवळीच, संजय राठोड की मग दुसराच उमेदवार असेल हेही स्पष्ट होईल.