Tv9 स्पेशल रिपोर्ट : ‘जनता दुसरं एन्काऊंटर करेल’, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरुन राजकारण तापलं
बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन विरोधकांनी शंका उपस्थित केलीय. ज्या शाळेत चिमुकलींवर अत्याचार झाले तिथल्या फरार संस्थाचालकांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर झाल्याचं विरोधकांनी म्हटलंय. दुसरीकडे संजय राऊतांनी, मुख्यमंत्री शिंदेंवरच निशाणा साधला. एका शिंदेंचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर जनता करेल, असं राऊत म्हणाले आहेत.
बदलापुरातील आरोपी अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काऊंटर केलं. मात्र त्यानंतर राजकीय शाब्दिक एन्काऊंटर सुरु झाला. एका शिंदेचा एन्काउंटर झाला. आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर जनता करणार, अशी टीका संजय राऊतांनी केली. संजय राऊतांचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरच आहे, त्यामुळे शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांनीही एन्काऊंटरच्याच भाषेत उत्तर दिलं. शरद पवारांची सुपारी घेवून राऊतांनीच उबाठाचा एन्काऊंटर केला, अशी टीका शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केली. तर एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर करायला राऊतांना 7 जन्म घ्यावे लागेल, असं वक्तव्य शिवसेना नेते भरत गोगावले यांनी केलं. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील याबाबत वक्तव्य केलं. “एकनाथ शिंदेंनीच उद्धव ठाकरेंचा राजकीय एन्काऊंटर केला”, असं मंत्री रामदास आठवले म्हणाले.
पोलिसांवर गोळीबार केल्यावर, आरोपी अक्षय शिंदेंवर स्वरक्षणासाठी गोळीबार केल्याचं पोलीस निरीक्षक संजय शिंदेंचं म्हणणं आहे. मात्र विरोधकांनी, वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ज्या बदलापुरातील शाळेत 2 चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली त्या शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल, संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना वाचवण्यासाठी शाळेचा सफाई कामगार आणि आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तुषार आपटे आणि उदय कोतवालांवरही गुन्हा दाखल झालेला आहे आणि दोघेही फरार आहेत. विशेष म्हणजेच आरोपी अक्षय शिंदेचं एन्काऊंटरच्याच दिवशी आपटे आणि कोतवालांनी हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आता 1 ऑक्टोबरला सुनावणी आहे.
शाळेच्या संस्थाचालकांना वाचवण्यासाठी आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला, असं संजय राऊत म्हणाले. बाकी आरोपींचंही एन्काऊंटर करा, शाळा भाजपशी संबंधित आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. कायदा सर्वांसाठी लागू, आरोपी नसलेल्यांना आरोपी करायचं का? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला. आदित्य ठाकरेंनीही अद्याप शाळेच्या संस्था चालकांना अटक का नाही ?, असा सवाल करुन सरकारला घेरलं आहे. तर पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेंला ठोकला पण एन्काऊंटर मविआचा झाला, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.
विरोधकांनी एन्काऊंटर नंतर गंभीर शंका उपस्थित केलीय. शाळा भाजप आणि संघाशी संबंधित असल्यानं प्रकरण दाखण्यासाठी एन्काऊंटर केल्याचं विरोधक म्हणतायत. तर, संस्थाचालक आणि सचिव पोलिसांच्या हाती लागले नसले तरी ते हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी पोहोचले आहेत.