प्रहार जनशक्ती आणि वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाकडून मिळालं हे चिन्ह
राज्यातील दोन महत्त्वाचे पक्ष बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाकडून चिन्ह जाहीर करण्यात आलं आहे. दोन्ही पक्षांना काय चिन्ह मिळालंय जाणून घ्या.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह मिळाले आहे. यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अनेकदा कप बशी चिन्हावर निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीत प्रहारला शिट्टी हे चिन्ह मिळालं होतं. यानंतर आता प्रहार पक्षाला पुढच्या निवडणुका बॅट या चिन्हावर लढवाव्या लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रहार जनशक्ती पक्षाला हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे प्रहार पक्ष आता विधानसभा निवडणुका बॅट या चिन्हावर लढवू शकते.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे. तर भारत आदिवासी पक्षाला हॉकी आणि बॅट हे चिन्ह मिळाले आहे. महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. या दोन्ही पक्षाला राज्यातील काही भागात होणार मतदान मोठं आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षाला मिळालेल्या या चिन्हावर निवडणूक लढवता येणार आहे.
राज्यात विधानभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन होणार आहे. नवीन सरकार स्थापन होण्यासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा निकाल लागणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात 2019 ते 2024 या काळात राज्याने अनेक राजकीय भूकंप पाहिले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झालीये. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक खूप महत्त्वाची मानली जातेय. मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.
राज्यातील 288 जागांच्या विधानसभेत 2019 च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते.