‘लोकसभेत ओबीसींचे 13 खासदार गेले नाही तर आरक्षण…’, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान काय?
"उद्याच्या निवडणुकीत काय काय वाटप केलं जाईल. तर कबाबचं वाटप केलं जाईल. शबाबचं वाटप केलं जाईल. आणि त्याबरोबर महात्मा गांधीही वाटप केला जाईल अशी परिस्थिती आहे. याला जर बळी पडला तर आरक्षण सोडा हे संविधानही गेलं म्हणून समजा", असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
धाराशिव | 24 जानेवारी 2024 : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज ओबीसी एल्गार मेळाव्यात मोठं वक्तव्य केलं आहे. “ओबीसी आणि मराठा भांडण सुरू आहे. तुम्ही जी भूमिका घेतली की, ओबीसींचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं हे आता राजकीय दृष्टीकोणातून मान्य झालं आहे. आता ते टिकवण्याचं राजकारण करावं लागेल. दोन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेत ओबीसींचे १२ ते १३ खासदार गेले नाहीत तर आरक्षण टिकवणं कठिण राहिल. मग भुजबळांसारखी कितीही माणसं लढली तरी आपल्याला ठेंगाच मिळेल”, असा मोठा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
‘तर आरक्षण सोडा हे संविधानही गेलं म्हणून समजा’
“उद्याच्या निवडणुकीत काय काय वाटप केलं जाईल. तर कबाबचं वाटप केलं जाईल. शबाबचं वाटप केलं जाईल. आणि त्याबरोबर महात्मा गांधीही वाटप केला जाईल अशी परिस्थिती आहे. याला जर बळी पडला तर आरक्षण सोडा हे संविधानही गेलं म्हणून समजा. महात्मा फुले यांना जाऊन किती वर्षे झाली? १५० वर्षे तर झाली. आजही त्यांना शिव्या घातल्या जात आहे. आजही त्यांची निंदा नालस्ती केली जात आहे का? फुले दाम्पत्यांचा आजही चेष्टा केली जात आहे. का? तर या देशाची गुलामीची जी व्यवस्था होती. जाती प्रथेची व्यवस्था होती, स्त्री शिक्षणाविरोधी व्यवस्था होती ती उलथवून टाकण्याची त्यांनी सुरुवात केली. आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून कायम स्टँम्प मारला. ही व्यवस्था परत येणार नाही याची तजवीज केली”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही’
“महात्मा फुले असतील. शाहू महाराज असेल बाबासाहेब असतील यांच्याबद्दल आठवड्यातून दोन चार वेळा कायम विडंबन करणारं लिखाण छापून येतं याचं कारण इथली वर्णव्यवस्था जी होती, जात व्यवस्था होती ती उद्ध्वस्त झाली आणि समतेची व्यवस्था सुरू झाली. आज तीच लढाई पुन्हा सुरू झाली आहे. ज्यांना तुम्ही उद्ध्वस्त केलं, आज तेच पुन्हा म्हणत आहेत की आम्ही सत्तेत आलो तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही”, असं आंबेडकर म्हणाले.
“या संविधानामुळे काय झालं तर अठरा बलुतेदार आणि १२ बलुतेदार हा सत्तेत जाऊ लगला. त्याला ते बंद होतं. ते मोडलं ते शिवाजी महाराजांनी मोडलं. इतर कोणत्याही राजात ही ताकद नव्हती. त्यामुळे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत शिवाजी महाराज जिवंत राहतील. लोकांच्या मनात शिवाजी महाराज जिवंत राहतील. लोकांच्या विचारांमध्ये जिवंत राहतील. त्यामुळे ही व्यवस्था ठेवायची की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी समाजव्यवस्थेत भांडण सुरू झालं आहे”, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.