नितेश राणे यांचा ‘वेडा आमदार’ म्हणून उल्लेख, प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
पोलीस स्वत:ला संकटात टाकून, आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत असतात. ते सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय. असं असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केलीय.
गणेश सोनोने, Tv9 मराठी प्रतिनिधी, अकोला | 23 फेब्रुवारी 2024 : भाजप आमदार नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यात पोलिसांवर टीका केली. त्यांनी भाषण करताना पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली. पोलीस स्वत:ला संकटात टाकून, आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत असतात. सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात होता. काही जणांकडून नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी देखील केली जात होती. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी नितेश राणे यांचा ‘वेडा आमदार’ असा उल्लेख केला.
प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलतांना त्यांना फार महत्त्व देऊ नये असं म्हटलंय. नितेश राणे यांचा उल्लेख त्यांनी ‘वेडा आमदार’ असा केलाय. त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाहीय. यासोबतच पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
“नितेश राणे यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण पोलिसांनी कारवाई करु नये. दुर्लक्ष करावं. एक वेडा आमदार म्हणतोय, असं म्हणावं आणि सोडून द्यावं. त्याचे परिणाम पुढे घातक होतील असं मला तरी वाटत नाही. ते व्यक्तीमत्वावर अवलंबून असतं. त्यामुळे या वक्तव्याकडे दुर्लक्ष करावं”, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालंय. प्रकाश आंबेडकर यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “मनोहर जोशी यांनी दादर येथे पहिल्यांदार कोहिनुर टेक्निकल सुरु केलं. त्याचा अनेकांना फायदा झाला. तर त्यांचं शिक्षक म्हणून कार्य मोठं आहे. नंतर ते महापौर झाले. मुख्यमंत्री झाले. लोकसभेचे स्पीकर झाले आणि त्यांनी पदावर असतांना अनेक गोष्टी कुशलतेने हॅन्डल केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे हे एक स्वत: मोठं नाव असतांनाही त्यांच्या बरोबरीत मनोहर जोशीचं नाव घेतलं जायचं. त्यातून त्यांचं कर्तृत्व आणि कुशलता खुप मोठी आहे. ते आज आपल्यात नाहीत. त्यांना मी आणि माझ्या परिवाराकडून आदरांजली अर्पण करतो”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.