ओबीसींच्या मुद्यावर सरकार आग्रही नाही, महाज्योतीला काहीच कसं मिळत नाही ? प्रकाश शेंडगेंचा सरकारला सवाल
येत्या 26 तारखेला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. तरीदेखील ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला.
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण, वस्तीगृह, विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच इतर मुद्यांना घेऊन ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला घेरलं. ओबीसींच्या मुद्यावर सरकार कुठेही आग्रही नाही. सारथीला सगळं काही मिळतं मग महाज्योतीला काहीच कसं मिळत नाही. विद्यार्थी वेतनाला पैसे मिळत नाहीत, असा आरोप शेंडगे यांनी केला. तसेच येत्या 26 तारखेला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. तरीदेखील ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला.
पैसे कुठे गेले याची सरकार चौकशी करत नाही
“सारथीला सगळं काही मिळतं मग महाज्योतीला काहीच कसं मिळत नाही. विद्यार्थी वेतनाला पैसे मिळत नाहीत. महाज्योतीच्या योजनेतून पायलट बनवण्यासाठी अडीच कोटी रूपयांचं कंत्राट दिलं गेलं. मात्र त्या कंपनीकडे एकही विमान नाही. कंपनी आधीच बंद पडलेली आहे. ही कंपनी नागपूरची आहे. महाज्योतीचे अध्यक्षही नागपूरचेच आहेत. पैसे कुठे गेले याची सरकार चौकशी करत नाही,” असे शेंडगे म्हणाले.
…तर चांगली ताकद उभा राहील
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली. ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून संरक्षण देण्याचं राज्य सरकारचं ढोंग करत आहे, असा थेट हल्ला त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी पंकजा मुंडे यांचं स्वागत आहे. पण ओबीसी समाजाला दावणीला बांधू नये. पक्षीय भूमिकेतून बाहेर येऊन आपापल्या परीनं सगळे काम करत असतील तर चांगली ताकद उभा राहील, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.
ST कर्मचाऱ्यांचा मोर्चा वेगळ्या वळणावर येऊन ठेपलाय
पुढे बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनालवरदेखील भाष्य केलं. ST कर्मचाऱ्यांचा मोर्चा वेगळ्या वळणावर येऊन ठेपलाय. एका आंदोलनाला वेगळ रूप देऊ नका, असे आवाहन शेंडगे यांनी केले.
इतर बातम्या :
Muslim Reservation : ‘एमआयएम’चा 11 डिसेंबरला एल्गार, मुस्लिम आरक्षणासाठी ‘चलो मुंबई’चा नारा
‘तलवार नही, कलम जिंदा रखेगी तुमको’, सोलापुरात ओवेसींकडून ‘फुले आंबेडकरांचा’ धडा, नेमके काय म्हणाले?