देशात शिवरायांना मानणारा सर्वात मोठा नेता कोण? शिंदे गटातील मंत्र्यांने घेतलं ‘या’ व्यक्तीचं नाव
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्वीटमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि महायुतीने राहुल गांधी यांच्यावर तीव्र टीका केली असून माफी मागण्याची मागणी केली आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. 19 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण देशभरात शिवरायांची 395 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजपसह महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करु, असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. आता यावर महायुतीतील एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नसावं. गांधी परिवाराने केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेसविषयी बोलावं, अशा शब्दात प्रताप सरनाईक यांनी टीका केली.
“मी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो”
“देशातील आराध्य दैवतांबाबत त्यांनी काही बोलू नये. त्यांना काही माहिती नाही. राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी छत्रपती शिवरायांनी काय केले, हे राहुल गांधींना माहिती नाही. त्यामुळे देशाच्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करणारा व्यक्ती शिवरायांना अशी श्रद्धांजली वाहत असेल तर मी त्याचा धिक्कार करतो. मी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो”, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.
“देशात शिवरायांना मानणारा सर्वात मोठा नेता कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. शिवरायांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची छाती फुलून येते. त्यांच्या मनात शिवरायांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे या विषयावर न बोललेले बरे”, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
“संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची तुलना होऊ शकत नाही”
संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची तुलना होऊ शकत नाही. कोणीतरी सकाळी उठून कोल्हे कोई करतो. त्या प्रत्येकाला आम्ही उत्तर द्यायचं योग्य नाही. शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हे आम्ही दाखवून दिले. त्यामुळे कोण काय कोल्हे कुई करतो. त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची गरज नाही, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.
कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्यात यावा. कमाल खानसारख्या माणसाला रस्त्यावर उतरून तुडवलं पाहिजे. कमाल खानपर्यंत आमचे शिवसैनिक पोहोचले तर त्याला रस्त्यावर जोड्याने मारतील, असेही प्रताप सरनाईकांनी म्हटले.
“आता वेळ निघून गेलेली आहे”
“उद्धव ठाकरेंनी हे जर ही बैठक आधी घेतली असती तर ही वेळ आली नसती. पक्ष वाढवण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी असे प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र आता वेळ निघून गेलेली आहे. आता किती बैठका घेतल्या? कितीही मंगळवार आले तर त्यांना काही यश प्राप्त होणार नाही. अनेक नेते शिवसेनेत सहभागी होत आहेत. आम्ही त्यांचे स्वागत करतोय”, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.