दरेकर म्हणतात, दाऊद नाव केवळ मुस्लिमांचच का? मराठ्यांमध्येही आहेत, वानखेडेवर वाद वाढणार?
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये. दाऊद नाव केवळ मुस्लिमांचंच आहे का ? मराठ्यांमध्येही आहेत, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलंय.
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे यांना शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचं मलिक यांनी म्हटलंय. या गंभीर आरोपानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. नवाब मलिक यांनी जातीवाचक, व्यक्तीगत राजकारण करु नये. दाऊद नाव केवळ मुस्लिमांचंच आहे का ? मराठ्यांमध्येही आहेत, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलंय.
प्रविण दरेकर काय म्हणाले ?
“नवाब मलिक यांनी जातीवाचक किंवा व्यक्तीगत राजकारण करू नये. दाऊद हे नाव केवळ मुस्लिमांचंच आहे का ? मराठ्यांमध्येही आहेत. तपास यंत्रणा, न्याय व्यवस्था कारवाई करेल. नवाब मलिक हवेत गोळीबार करतात,” असे प्रविण दरेकर म्हणाले.
परमबीर सिंह आमचे काही लागतात का?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना नुकतेच फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयावरदेखील दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. “डाव काही नाही, अनिल देशमुख किंवा परमबीर यांना कायदा समान आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा. परमबीर सिंह आमचे काही लागतात का?,” असे म्हणत भाजप आणि परमबीर सिंह यांचा संबंध नसल्याचे दरेकर यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा कट
तसेच मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरदेखील त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. “या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा कट आखला आहे. हे निगरगट्ट सरकार असून आतापर्यंत 40 पेक्षा जास्त जणांचा जीव गेला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल मेढ्यात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. सरकारला कीती बळी हवेत ? पवार साहेब म्हणात चर्चेतून मार्ग काढा. पण चर्चा दिखाव्याची आहे. सरकारकडे ठोस ऊपाय नाही. मुद्यावर चर्चा नाही, केवळ बनाव केला जातोय. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काहीतरी तोडगा काढावा लागेल. हजारोंच्या संख्येनं कर्माचारी रस्त्यावर आहेत. हा अहंकाराचा विषय केला आहे. येत्या काळात आम्हाला सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करावी लागेल,” असे दरेकर म्हणाले.
इतर बातम्या :
Special Story! सोयाबीन दरवाढीच्या पडद्यामागची गोष्ट, शेतकऱ्यांनी दाखवले एकीचे ‘बळ’