मोक्कार पावसाची नाशिकमध्ये हजेरी, द्राक्ष बागायतदारांच्या काळजाचा ठोका चुकला, साहित्य संमेलनावरही सावट!
नाशिकमध्ये आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
नाशिकः गेल्या सप्टेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांच्या रानारानात हैदोस घालणाऱ्या, त्यांचा खरीप हंगाम मातीमोल करणाऱ्या आणि अक्षरशः जमीन खरवडून नेणाऱ्या मोक्कार पावसाने आज सकाळपासून पुन्हा एकदा नाशिक शहरात हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. आता नको रे बाबा, पुरे झाले, अशी विनवणी ते करताना दिसत आहेत.
सध्या का होतोय पाऊस?
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या 3 डिसेंबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या ध्रुवीय वाऱ्याची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे तापमानात गारठाही वाढणार आहे. बोचरी थंडी आणि पाऊस असे विचित्र वातावरण या काळात राहणार आहे.
शेतकऱ्यांना चिंता
द्राक्ष बागायतदारांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. खरिपात आलेल्या पावासाने साऱ्या पिकांची वाट लावली. आता पुन्हा एकदा दिवाळीनंतर आलेल्या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे नुकसान करू नये म्हणजे झाले. द्राक्षाच्या लागवडीपासून हे पीक हाती पडेपर्यंत शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. महागड्या औषधांची फवारणी करावी लागते. आता जर पावसाने हजेरी लावली, तर या पिकाचे प्रचंड नुकसान होणार आहे.
संमेलनावर सावट
नाशिकमध्ये येत्या 3 डिसेंबरपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, आता अचानक पावसाने हजेरी लावल्याने आयोजकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुख्य मंडपासह इतर ठिकाणी बैठक व्यवस्थेसह इतर कामे अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पावसाने एखादा दिवस वाढवला, तर रसिकांची आणि आयोजकांचीही तारांबळ होणार आहे. पावसात रसिक उपस्थित राहतील का, अशी शंका उपस्थित होत आहे.
रोगट वातावरण
सध्या कोरोनाच्या ऑमिक्रॉन विषाणूची धास्ती साऱ्या जगाने घेतली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात अतिशय रोगट वातावरण आहे. कालही दिवसभर ढगाळ वातावरण होते. मध्येच थंडी आणि मध्येच पाऊस, अशी विचित्र अवस्था होती. या वातावरणाने लहान मुले आजारी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
इतर बातम्याः
सुखवार्ताः नाशिक विभागात 9 लाख 77 हजार 400 जण कोरोनामुक्त; मृत्युदर फक्त 2 टक्के