मुंबईत तुरळक तर राज्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, तीन-चार दिवस हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज
मुंबईत अचानक वातावरणात बदल होऊन सुर्यमहाराजांचे दर्शन बुधवारी सकाळी झाले नाही, अचानक ढगांची चादर ओढल्याचे वातावरण असतानाच सायंकाळी मुंबई सह राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी दाखविल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपिट उडाली.
मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : मुंबईसह राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर अचानक हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या सांगलीसह अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची त्रेधातिरिपीट उडाल्याचे चित्र आहे. गेले काही दिवस मुंबईत प्रदुषणाने चिंता व्यक्त केली जात असताना आज सकाळी सुर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही. ढगाळ वातावरणाने अचानक हवामान बदलल्याचे चित्र होते. सायंकाळी मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी दिल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. राज्यातील काही भागात नुकतीच थंडीला सुरुवात झाली होती. त्यानंतर थेट पावसाच्या सरी कोसळल्याने हवामानात अचानक बदल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोमवारी सकाळी 10.30 वाजताचे सॅटेसाईटच्या फोटोवरून केरळ, कर्नाटक, दक्षिण गोवा, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगांचे आच्छादन पसरल्याचे हवामान विभागाने ट्वीटरवर जारी केले. हवामान खात्याचे तज्ज्ञ के.एच.होसाळीकर यांनी या संदर्भात ट्वीटरवर माहीती दिली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामानात बदल झाल्याचे होसाळीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे या भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील आणि दोन ते तीन दिवस असेच ढगाळ हवमान राहणार असल्याचे होसाळीकर यांनी म्हटले आहे.
येथे पाहा ट्वीट –
8 Nov,Latest satellite obs at 10.30am indicate light to mod intensity clouds ovr parts of #Kerala,#Karnataka, #Goa,South #Konkan,South #MadhyaMah & adj areas due to low pressure area ovr east central Arabian Sea with cycir over SE & adj EC Arabian Sea. Watch IMD updates please pic.twitter.com/FmaMQBRtOw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 8, 2023
विचित्र हवामानाचा सामना
मुंबईत एरव्ही देखील पुणे – नाशिक प्रमाणे गुलाबी थंडी फारसी जाणवत नाही. यंदा तर ऑक्टोबर अखेर तापमानात प्रचंड वाढ झाली होती. आणि सकाळी गारवा आणि दुपारी उन्हाचा तडाखा असे विचित्र तापमान होते. यंदा महाराष्ट्रातील इतर भागात मात्र थंडीची चाहुल लागली होती. मात्र, मुंबईत मात्र थंडीचा काहीच पत्ता नसताना अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सायंकाळी तर पाऊसच कोसळल्याने विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे.