अजित पवारांचा गटकडून महायुतीवर दबाव की दबावाआडून नव्या मार्गासाठी चाचपणी?
महायुतीत वाद झाल्यास दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येवू शकतात अशी विधानं करुन अजित पवार गटानं नव्या चर्चा सुरु केल्या आहेत. मात्र खरोखर महायुतीत वाद झाल्यास अजित पवार काय निर्णय घेतील....स्वतंत्र लढतील., शरद पवारांसोबत जातील की मग तिसरी आघाडी उघडतील., पाहूयात हा रिपोर्ट.
गेल्या आठवड्याभरातल्या घडामोडी पाहिल्या तर अजित पवारांचा गट महायुतीवर दबाव बनवतोय. की दबावाआडून नव्या मार्गासाठी चाचपणी आजमावून पाहतोय., अशी शंका निर्माण होतेय. 3 दिवसांपूर्वी नेत्यांनी महायुतीत घडबड झाल्यास शरद पवारांसोबत जाण्याची केलेली विधानं असोत. मिटकरी-कोकाटेंनी थेट भाजपच्या मंत्र्यांवर ओढलेले ताशेरे असोत. किंवा मग निधीवरुन भाजपच्या काही मंत्र्यांवर अजित पवारांचा उफाळून आलेला संताप असो. या साऱ्या गोष्टी 5 शक्यतांकडे बोट दाखवत आहेत.
- एकतर अजित पवारांचे काही नेते महायुतीत सत्तेत असूनही नाखूश आहेत का?
- लोकसभेला अवघ्या ४ जागा मिळाल्यानं विधानसभेत किती मिळणार यावरुन साशंक आहेत का?
- लोकसभेसारखं विधानसभेत होऊ नये म्हणून अजित पवारांचा गट दबाव बनवतोय का?
- अजित पवारांच्या गटानं स्वतःहून सत्तेबाहेर पडण्याची कसरत सुरु केलीय का?
- किंवा मग बाहेर पडण्यासाठीची परिस्थिती महायुतीच्याच संमतीनं निर्माण केली जातेय का?
यापैकी एकही शक्यता खरी ठरल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुढे काय होणार?
- अजित पवारांची राष्ट्रवादी आगामी विधानसभा स्वबळावर लढवणार का?
- सत्तेविना अजित पवारांसोबत किती आमदारांचं पाठबळ राहिल?
- जर परतीचा मार्ग स्वीकारला तर शरद पवारांकडे पुन्हा येणार का?
- शरद पवारांची राष्ट्रवादीतून त्यासाठी होकार मिळेल का?
- की मग तिसरी आघाडी उघडून अजितदादा महायुतीस पूरक असे उमेदवार देतील?. याबाबत विविध तर्क मांडले जाताय आहेत.
महायुतीत अजित पवार कायम राहिले तर फक्त जागांचा आकडाच नव्हे तर जागांचा मुद्द्याचाही पेच आहे. कारण या घडीला अजित पवारांसोबत जे 41 आमदार आहेत. त्यापैकी 20 आमदार 2019 मध्ये भाजप उमेदवारांना पराभूत करुन विधानसभेत पोहोचलेत
8 आमदारांनी सध्या शिंदे गटासोबत असलेल्यांना पराभूत केलंय. म्हणजे अजितदादांच्या 41 पैकी जवळपास 28 आमदारांचा मुकाबला आत्ताच्या महायुतीच्या विरोधात होता. खुद्द अजित पवारांसह त्यांचे जे 9 मंत्री भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यापैकी 7 जणांचा गेल्यावेळी भाजपशीच सामना झाला होता.
अजित पवारांमुळे पराभव झाला., त्यामुळे ते सोबत नकोत., असा मानणारा भाजपत एक मोठा वर्ग आहे. दुसरीकडे फणवीस अजित पवारांसोबतची युती म्हणजे एक तह आहे., म्हणत त्यावर सावधपणे बोलतायत. आणि तिसरीकडे अजितदादांच्या आमदारांनी आता भाजपविरोधात उघडपणे बोलायला सुरुवात केलीय. त्यामुळे भविष्यात अजित पवार काय निर्णय घेतात., विधानसभेआधी महाराष्ट्रात पुन्हा नवा भूकंप घडतो का? आणि जर-तरच्या या शक्यतांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं भविष्य काय असेल., याचा फैसला विधानसभेच्या निकालावेळी लागणार आहे.