अजित पवार यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदनगर येथील निळवंडे प्रकल्पाचे जलपूजन करून लोकार्पण करण्यात आले. या समारंभात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता, त्यांच्यावर जोरदार टीका केली.
अभिजित पोते, शिर्डी | 26 ऑक्टोंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत साईबाबा यांचे दर्शन घेतले. त्यानंतर निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण केले. त्यानंतर शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर होते. शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्न विचारुन आताच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी राज्य सरकारने सुरु केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे कौतूक केले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
अजित पवार यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांचे सरळ नाव न घेता म्हणाले, महाराष्ट्रातील एक मोठे नेते आणि अनेक वर्षे देशाचे कृषिमंत्री असलेल्या व्यक्तीने शेतकाऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी त्यांच्या कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळातील सात वर्षांत किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपीवर साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. आमच्या सरकारने सात वर्षांच्या कार्यकाळात साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले.
तेव्हा शेतकरी दलालांवर निर्भर
२०१४ पूर्वी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी दलालांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक महिने पैशांसाठी वाट पाहावी लागत होती. परंतु आमच्या सरकारने ही दलालशाही मोडीत काढली. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम पाठवली जात आहे. सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळत असल्यामुळे दलालीशाही संपली आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंबचा उपयोग करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना पाण्याचा एक थेंबही वाचवण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, पाणी हे ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करा. पाण्याचा प्रत्येक थेंब वापरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा. आमच्या सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले दिले. त्यांना वेळेवर पैसा मिळावे, यासाठी साखर कारखान्यांना हजारो कोटींची मदत केली आहे. सहकार चळवळ अधिक मजबूत करण्याचे काम केले जात आहे. कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी सहकारी समित्यांना मदत दिली जात आहे.