काँग्रेसकडून विदेशाच्या धरतीवरुन देशविरोधी अजेंडा…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यावर मोठा हल्ला
Narendra Modi: काँग्रेसच्या लोकांची भाषा पाहा. परदेशात जाऊन त्यांचा देशविरोधी अजेंडा सुरू आहे. समाजाला तोडणे, देशात फूट पाडण्यावर ते बोलत असतात. तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्षली लोक काँग्रेस चालवत आहे. देशातील सर्वात भ्रष्ट आणि बेईमान पार्टी काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब हे काँग्रेसचे शाही कुटुंब आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विदर्भ दौऱ्यात काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. काँग्रेस सरकारने आतापर्यंत विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहचू दिला नाही. एका व्यक्ती आणि एका घराण्यावर काँग्रेस पक्षाचा भर राहिला. आता तर काँग्रेस आपला देशविरोधी अजेंडा विदेशातून राबवत आहे. विदेशाच्या धरतीवर जाऊन देशविरोधी वक्तव्य केले जात आहे, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केला. राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचा मोदी यांनी आपल्या भाषेत समाचार घेतला.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
ज्या काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या मित्रांनी शेतकऱ्यांना बर्बाद केले. त्यांना परत संधी द्यायची नाही. काँग्रेसचा एकच हेतू खोटे बोलणे, फसवणूक करणे आणि बेईमानी आहे. काँग्रेसने तेलंगणात कर्जमाफीची घोषणा केली. त्यांचे सरकार आले. पण त्यांनी कर्जमाफ केले नाही. महाराष्ट्रात आपल्याला त्यांच्या धोकेबाजीपासून सावध राहिले पाहिजे. आज जी काँग्रेस आहे, ती महत्वा गांधी यांची काँग्रेस नाही. आजच्या काँग्रेसमध्ये देशभक्तीची आत्मा मेली आहे. आजच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचे भूत आहे.
काँग्रेसकडून देशविरोधी अजेंडा
आज काँग्रेसच्या लोकांची भाषा पाहा. परदेशात जाऊन त्यांचा देशविरोधी अजेंडा सुरू आहे. समाजाला तोडणे, देशात फूट पाडण्यावर ते बोलत असतात. तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्षली लोक काँग्रेस चालवत आहे. देशातील सर्वात भ्रष्ट आणि बेईमान पार्टी काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब हे काँग्रेसचे शाही कुटुंब आहे. ज्या पार्टीत आपल्या अस्था असेल ती पार्टी गणपती पूजेचा विरोध करणार नाही. पण आजच्या काँग्रेसला गणपती पूजेला विरोध आहे, असा हल्ला मोदी यांनी केला.
लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात गणेशोत्सव सुरू झाला. सर्व धर्मीय एकसाथ येत होते. काँग्रेसला गणपती पूजेचीही चीड आहे. मी गणेश पूजेला गेलो तर काँग्रेसचं तुष्टीकरण सुरू झाले. काँग्रेसने गणपती पूजेला विरोध केला. तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करत आहे. कर्नाटकात काँग्रेसने गणपतीला तुरुंगात टाकले, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून केला.