राज्यात दारुविक्री सुरु ठेवावी की बंद? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…
"राज्यात दारुविक्री सुरु करताना थोडासा गोंधळ झाला, असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले (Prithviraj Chavan on liquor sale).
सातारा : “राज्यात दारुविक्री सुरु करताना थोडासा गोंधळ झाला (Prithviraj Chavan on liquor sale). दोन दिवसांचा आणखी अवधी द्यायला हवा होता. दोन दिवसांमध्ये ऑनलाईन दारुविक्रीचा किंवा इतर पर्याय अवलंबला गेला असता. त्यामुळे एवढी गर्दी आणि गोंधळ झाला नसता”, असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे (Prithviraj Chavan on liquor sale).
“दारुविक्रीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. दारुवरचा एक्साईज टॅक्स आपल्याला हवा आहे. आपल्या राज्यात आपण दारुबंदी केलेली नाही. दारुविक्रीला परवानगी आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्रात कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातही मद्यविक्रीला काल (सोमवार 4 मे) सशर्त परवानगी देण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील वाईन शॉप्सवर तळीरामांनी सकाळपासून गर्दी केली. राज्यभरात विविध भागांमध्ये मद्यप्रेमींनी वाईन शॉप्सच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या. मात्र, या रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले नाहीत. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“दारुविक्रीतून सरकारला थोड्याफार प्रमाणात महसूल मिळेल. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण दारुविक्रीला परवानगी दिल्यानंतर काही भागांमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले गेले. तिथे लगेच दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली. शिस्तबद्ध पद्धतीने ही खरेदी-विक्री झाली तरच दारुविक्री सुरु राहावी, असा माझा आग्रह आहे. त्यामुळे लोकांनी थोडासा धीर धरला पाहिजे. दुकानदारांनी वेळ ठरवायला हवी”, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
“दारुविक्रीबाबत समाजात दोन वेगवेगळे मतं आहेत. एक मत असं आहे की, संपूर्ण राज्यात दारुबंदी व्हावी. त्याचे दुष्परिणाम काय होतात, ते आपण पाहिलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये दारुबंदी आहे तिथे किती मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी केली जाते, किती हातभट्या आहेत आणि पोलीस यंत्रणेवर किती ताण पडतो, हेही आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी सुवर्णमध्ये साधण्याचं काम राज्यात सुरु आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
Mumbai Lockdown | मुंबईतील सर्व सवलती रद्द; दारु विक्री बंद, बेशिस्तीमुळे आयुक्तांचा निर्णय
Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजार 525 वर, दिवसभरात 841 नवे रुग्ण