अजित पवार यांना शरद पवार यांचा धक्का, हा विश्वासू आमदार सोडणार साथ
lok sabha election 2024: अजित पवार यांचे विश्वासू आमदार निलेश लंके त्यांची साथ सोडणार आहे. निलेश लंके शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली.
योगेश बोरसे, पुणे | दि. 11 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार यांचे विश्वासू आमदार निलेश लंके त्यांची साथ सोडणार आहे. निलेश लंके शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली. त्यानंतर लंके यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपकडून सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीतून निलेश लंके अशी लढत आता होण्याची शक्यता आहे.
अमोल कोल्हे यांनी दिले होती ऑफर
अहमदनगरला निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित महानाट्याच्या वेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लंके यांना महाविकास आघाडीत येऊन तुतारी घेऊन निवडणूक लढण्याच निमंत्रण दिल होतं. महाराष्ट्राच्या स्वाभिमानीसाठी दिल्लीच्या तक्त्याला घाम फोडणारा असा लोकनेता आता आमच्या खांद्याला खांदा लावून संसदेत यावं, असे कोल्हे यांनी म्हटलं होतं. तर लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगर दक्षिणमध्ये वाजवलीच पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर निलेश लंके यांनीही सूचक वक्तव्य केले होते. आता निलेश लंके शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
लंके कुटुंबियांची उपस्थिती राहणार
निलेश लंके यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थित सोमवारी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती. आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शरद पवार त्यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. यामुळे आज पक्ष प्रवेश दरम्यान निलेश लंके यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नगरमध्ये निलेश लंके आणि राणी लंके यांचे फलक पाहण्यास मिळाले होते.