सांगली आरटीओ कार्यालयाच्या कारभाराविरोधात आंदोलन, नागरिकांवरच गुन्हा दाखल
सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वतंत्र अधिकारी नसल्याने कराड येथील आरटीओ अधिकारी येथे आठवड्यातून तीन दिवस येतात. त्यामुळे या सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाला स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा आणि सांगली उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

सांगली | 7 डिसेंबर 2023 : सांगलीच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रकारे सेवा न देता एजंटद्वारे आलेल्या नागरिकांची कामे केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांची वाहन विषयक कामे रखडल्याचा आरोप होत आहे. कराड येथील आरटीओ अधिकारी येथे आठवड्याचे तीन दिवस येत असून त्यांचेही दर्शन दुर्लभ झाले आहे. या कार्यालयात अनधिकृत व्यक्तींचा संचार सुरु असल्याचा आरोप करणाऱ्या नागरिकांवरच येथील आरटीओ कर्मचाऱ्यांनी सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोल्हापूर येथील आरटीओ कार्यालयात उद्यापासून उपोषण आंदोलन सुरु करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
सांगलीच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांची कामे वेळेत होत नसून सर्वसामान्य नागरिकांच्या कामांची ऐवजी एजंटांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. या संदर्भातील तक्रार करण्यास गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी असभ्यवर्तन केले गेल्याने नागरिकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोरच ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी नागरिक आणि सबंधित अधिकाऱ्याच्या झालेल्या वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी आरटीओच्या संबंधित अधिकाऱ्याकडून आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरच संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीच्या उप प्रादेशिक कार्यालयातील विलास दशरथ कांबळे आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत वसंतराव साळी यांच्याविरोधात त्यांची चौकशी करावी अशी आपण तक्रार केली आहे. आम्ही या प्रकरणात तक्रार करायला आलो असता प्रशांत साळे साहेब यांनी उद्धट वर्तन केले आहे. यावेळी त्यांच्या कार्यालयात अनधिकृत व्यक्ती संगणक आणि दप्तर हाताळत होते. या विषयी आम्ही त्यांचे व्हिडीओ शुटींग केले आहे. त्यामुळे चिडलेल्या आरटीओ अधिकारी प्रशांत साळे यांनी आमच्यावरच सरकारी कामात अडथळा केल्याचा कलम 353 अनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत साळे यांच्याविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही कोल्हापूर आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे आंदोलक अंकुश केरीपाळे यांनी म्हटले आहे. सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जबाबदारी सध्या कराड येथील अधिकाऱ्यावरच सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सांगली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा अशीही मागणी अंकुळ केरीपाळे यांनी केली आहे.
भ्रष्टाचाराला वावच नाही !
प्रादेशिक कार्यालयाच्या 84 सेवा ऑनलाईन केल्या आहेत त्यापैकी 34 फेसलेस झाल्या आहेत. त्यामुळे घर बसल्या अर्ज भरून परिवहनाची सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. परिवहनाची सर्व कामे ऑनलाईन झाली आहेत. तसेच इतर काही तक्रार असल्यास नागरिक येथे येऊन संपर्क करु शकतात. तसेच आम्हाला सेवा हमी कायदा लागू असल्याने काम वेळेत करणे बंधनकारक आहेत. त्यामुळे कामात दिरंगाई होऊ शकत नाही. तसेच भ्रष्टाचाराला वावच नाही. अंकुश केळीपाळे हे मुद्दामहून व्हिडीओ काढून आंदोलनाचा आव आणतात. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ( सांगली ) वसंत साळे यांनी म्हटले आहे.