Pune Corona Update : पुण्यात कोरोनाचा कहर, प्रमुख रुग्णालयांमध्ये मात्र बेड्सची कमतरता!
पुणे शहरातील रुग्णालयांमध्ये साधारण 5 हजार 8 बेड असून, त्यापैकी फक्त 490 बेड्स शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणा सक्षम असणं नितांत गरजेचं आहे. पण पुणे शहरातील प्रमुख रुग्णालयांमध्ये आताच बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये साधारण 5 हजार 8 बेड असून, त्यापैकी फक्त 490 बेड्स शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.(Increase in the number of corona patients in Pune, shortage of beds in major hospitals)
पुण्यातील कोरोना स्थिती –
पुणे शहरात रविवारी तब्बल 4 हजार 426 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिवसभरात 2 हजार 107 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर पुण्यात गेल्या 24 तासांत 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यातील 7 जण पुण्याबाहेरील होते. पुण्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 123 आहे. त्यातील 645 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 25 लाख 9 हजार 112 वर जाऊन पोहोचली आहे. तर 22 लाख 770 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 16 हजार 804 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिवसभरात नवे ४ हजार ४२६ कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ४२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ५९ हजार ११२ इतकी झाली आहे.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 28, 2021
रुग्णालयातील बेड्सची स्थिती काय?
पुण्यातील कोरोना स्थिती इतकी विदारक बनली असताना दुसरीकडे आरोग्य विभागासमोर बेड्सची समस्या निर्माण झाली आहे. पुणे शहरात साधारणपणे 5 हजार 8 बेड्स उपलब्ध आहेत. त्यातील सध्या केवळ 490 बेड शिल्लक आहेत. त्यात साध्या बेड्सची संख्या 243, ऑक्सिजन बेड 217, आयसीयू बेड 20 तर व्हेंटिलेटर बेड 10 आहेत. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात साधारण 2 हजार 682 बेड कमी पडत आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के बेड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही चिंता व्यक्त
कोरोना रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक काल पार पडली. या बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एक गंभीर बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली. राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत, अशी परिस्थिती असल्याचं व्यास यांनी सांगितलं.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती
सध्या 3 लाख 57 हजार आयसोलेशन खाटापैकी 1 लाख 7 हजार खाटा भरल्या आहेत. उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. 60 हजार 349 ऑक्सिजन खाटापैकी 12 हजार 701 खाटा , 19 हजार 930 खाटापैकी 7 हजार 342 खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. 9 हजार 30 व्हेंटीलेटर्सपैकी 1 हजार 881च्या वर रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता कमी पडत आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra lockdown update : राज्यात लॉकडाऊनची दाट शक्यता, सरकारकडून कोणती खबरदारी?
Maharashtra lockdown update : अखेर मुख्यमंत्र्यांचा आदेश, लॉकडाऊनबाबत नियोजन करण्याचे निर्देश
Increase in the number of corona patients in Pune, shortage of beds in major hospitals