Lok Sabha Elections 2024 : पुण्यात गोंधळ, आंदोलन अन् प्रशासनावर संताप, लोकसभा मतदानातील घडामोडींची A to Z माहिती
पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे गायब झाली. अनेकांची मतदार यादीत नावे नसल्याने संताप व्यक्त केला. मतदारांनी यापूर्वी विधानसभा, लोकसभा आणि मनपा निवडणुकीत मतदान केले आहे, परंतु आता त्याचे नाव यादीत नाही.
पुणे आणि शिरुर लोकसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी सुरु झाले. यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे प्रकार उघड झाले. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडले. काल भाजप पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. आज भाजप नेते हेमंत रासने यांनी आंदोलन केले. बुथच्या ठिकाणी काँग्रेसचा प्रचार होत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. तसेच भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रशासनावर संतापले. ४ पोलिंग बुथ असताना मतदारांसाठी एकच रांग असल्याने त्यांचा संताप झाला. काही ठिकाणी मतदारांचे नाव नसल्याचे प्रकार घडले तर काही ठिकाणी मतदानास गेलेल्या व्यक्तीच्या नावाने आधीच मतदान झाल्याचा प्रकार घडला.
मुरलीधर मोहोळ संतापले
पुण्यातील एमआयटी शाळा पौड रोड येथे ४ पोलिंग बुथ असताना मतदारांसाठी एकच रांग होती. यामुळे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रशासनावर संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना ४ रांगा करायला सांगितल्या. प्रत्येक बुथसाठी स्वतंत्र रांग अपेक्षित असताना मतदान केंद्रावरचे अधिकारी एकाच रांगेतून सोडत होते. यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत होते.
हेमंत रासने यांचे आंदोलन
भाजप नेते हेमंत रासने यांनी पुण्यात आंदोलन केले. बुथ ठिकाणी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला. बुथ परिसरात काँग्रेस उमेदवाराचे बॅनर होते. हेमंत रासने यांनी आंदोलन केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी बॅनर काढून घेतले.
अरविंद शिंदे यांच्या नावावर दुसऱ्याने केले मतदान
पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोप झाला. मतदान ओळखपत्रावरच अनुक्रमांक एक आहे. मात्र मतदान केलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड वेगळे आहे. यामुळे माझ्या नावाने मतदान कसे झाले? असा सवाल अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. अरविंद शिंदे यांनी नंतर टेंडर वोट केले. निवडणूक आयोगाच्या नियम 42 अंतर्गत टेंडर मतदान करता येते.
शिरुर मतदार संघामध्ये बोगस मतदान
शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करुन केली स्वाक्षरी केली. प्रत्यक्षात मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराने बोगस मतदान होत असल्याचा प्रकार उघड केला. मतदान केंद्रात बोगस मतदानामुळे गोंधळ उडाला. याबाबत उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रतिनिधींनी केंद्र प्रमुखांना जाब विचारला.
मतदारांची नावे गायब
पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे गायब झाली. अनेकांची मतदार यादीत नावे नसल्याने संताप व्यक्त केला. मतदारांनी यापूर्वी विधानसभा, लोकसभा आणि मनपा निवडणुकीत मतदान केले आहे, परंतु आता त्याचे नाव यादीत नाही.