Pune | कोरोना संकटानंतर प्रथमच आषाढीसाठीचा पालखी सोहळा, पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजनाची पाहणी
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करण्यात यावे आणि पालखी मार्गाच्या केलेल्या पाहणीत आढळलेल्या तृटींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
पुणे: कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी यंदा प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पुण्यात पालखी सोहळा (Palkhi Ceremony) रंगणार आहे.10 जुलै रोजी आषाढी एकादशी असून जून महिन्यापासूनच संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम (Saint Tukaram) महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होते. या सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी निर्धारीत वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करण्यात यावे आणि पालखी मार्गाच्या केलेल्या पाहणीत आढळलेल्या तृटींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे पालखी सोहळ्याबाबत आयोजित प्राथमिक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते. तर संबंधित तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी काय दिले आदेश?
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुढील आदेश दिले.
- पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतेबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे.
- स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी.
- पालखी महामार्गाची कामे सुरू असल्याने वाटेत अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी.
- संबंधित विभागांकडून आवश्यक कामे तातडीने करून घ्यावीत.
- सासवड पालखी मुक्कामाच्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी.
- पुढील १० दिवसात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कामांचे सूक्ष्म नियोजन करावे.
- गेल्या दोन वर्षात कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने सुविधांचे नियेाजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.