Pune | अखेर अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्याची परवानगी मिळाली, कोथरुड पोलिसांकडून झाला होता विरोध
गणेश मंडळाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी या देखाव्यास परवानगी दिली आहे.
पुणेः पुण्यातील कोथरुड पोलिसांनी (Kothrud police) अफजल खान वधाच्या (Afzal khan Killing) जिवंत देखाव्याची परवानगी अखेर दिली आहे. संगम गणेश मंडळाच्या वतीने या देखाव्यासाठी (Pune Ganesh Mandal) काही दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती, मात्र पोलिसांकडून ती नाकारण्यात आली होती. याविरोधात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ईमेल द्वारे परवानगी मिळवण्यासंबंधीची विनंती केली होती. 26 ऑगस्ट पासून या गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ही परवानगी मिळवण्यासाठी उपोषणाला बसणार होते. मात्र अफजल खान देखाव्याचा वाढता वाद पाहता, पुणे पोलिसांनी परवानगी नाकारण्याचे पत्र मागे घेतले असून संगम गणेश मंडळाला असा जिवंत देखावा करण्याची परवानगी अखेर देण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मागील दोन वर्षांत कोरोनारुपी संकटामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला नव्हता. ही भूमिका मांडत कोथरुड येथील संगम गणेश मंडळाच्या वतीने यावेळी अफजल खान वधाचा जिवंत देखावा सादर करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी 11 ऑगस्ट रोजी मंडळाच्या वतीने पोलिसांकडे परवानगीचे निवेदन देण्यात आले होते. मात्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या कारणास्तव ही परवानगी नाकारली होती…
मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार गेली….
कोथरुड पोलिसांनी अफजल खानाच्या देखाव्याची तक्रार नाकारल्यानंतर संगम गणेश मंडळाने या कृतीचा निषेध व्यक्त केला. महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचा देखावा करण्यास परवानगी नाकारणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत यासंदर्भात माहिती देणारे ईमेल पाठवण्यात आले. तसेच अफजलखानाच्या वधाचा जिवंत देखावा सादर करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंतीदेखील गणेशमंडळाच्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली होती. ही परवानगी मिळाली नाही तर 26 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील गणेश मंडळातर्फे देण्यात आला होता.
दहीहंडी कार्यक्रमात गाजला देखावा
नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात अफजल खान वधाचा देखाला प्रचंड गाजला. मुंबईकीतल एका गोविंदा पथकाने दहीहंडीच्या सर्वात वरच्या थरावर शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करतानाचा देखावा सादर करण्यात आला. सोशल मिडियात या देखाव्याची प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर आता तसाच देखावा गणेश मंडळातर्फे साजरा करण्याची परवानगी मागण्यात आली होती.