त्या मुलांच्या त्रासामुळे माझ्या मुलाने शाळा सोडली, पुणे अपघातानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पत्नीच ट्विट चर्चेत
पुण्यातील कल्याणीनगर मधील कार अपघातात दोघांना जीव गमवावा लागला. नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवली आणि बाईकवरील दोघांना धडक दिली.
पुण्यातील कल्याणीनगर मधील कार अपघातात दोघांना जीव गमवावा लागला. नामवंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने कार चालवली आणि बाईकवरील दोघांना धडक दिली. त्यामध्ये एक तरूण व एका तरूणीचा जीव गेला. या घटनेनंतर पोलीस आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेनंतर सामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. केवळ पुण्यात नव्हे तर राज्यभरात याचे पडसाद उमटले असून राजकीय नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणात रोज नवनवे अपडेट समोर येत असून आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे याची पत्नी सोनाली तनपुरे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं असून त्याचीच चर्चा सुरू आहे. या अपघात प्रकरणातील काही मुलं आणि सोनाली तनपुरे यांचा मुलगा एकाच वर्गात शिकत होते. त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता, असे सोनाली यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहीले. त्या मुलांमुळे माझ्या मुलाला शाळादेखील सोडावी लागली. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता, असेही सोनाली यांनी नमूद केले.
काय आहे तनपुरे यांची पोस्ट
X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोनाली तनपुरे यांनी एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, पण अप्रत्यक्षरित्या त्यांचा रोख पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाकडे असल्याचे पोस्टवरून स्पष्ट होत आहे.
सोनाली तनपुरे यांची पोस्ट जशीच्या तशी त्यांच्याच शब्दात…
” कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे.
वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता.
त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा.” अशी मागणी सोनाली यांनी त्यांच्या पोस्टमधून केली आहे.
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
अल्पवयीन आरोपीला आज ज्युवेनाईल बोर्डासमोर हजर करणार
दरम्यान भरधाव वेगाने कार चालवून दोघांच्या मृत्यूसाठी जबाबदरा ठरलेल्या या अल्पवयीन आरोपीला आज ज्युवेनाईल बोर्डासमोर हजर करण्यात येणार आहे. आरोपी मुलासह त्याच्या पालकांनाही हजर राहण्याचे आदेश बोर्डाने दिले आहेत. ज्युवेनाईल बोर्डासमोर आज सुनावणी होऊन बोर्ड आदेश देणार आहे. काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर पुणे पोलीसांनी ज्युवेनाईल बोर्डाकडे धाव घेतील. आरोपी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याला तात्काळ जामीन मंजूर झाला होता. मात्र आज ज्युवेनाईल बोर्ड नेमका काय आदेश देतो ते पाहणं महत्वाचे आहे.