पुणे अत्याचारप्रकरणी निलेश राणेंचा संताप, देवेंद्र फडणवीसांकडे केली मोठी मागणी
पुण्यातील एसटी बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे एन्काउंटर स्कॉड परत आणण्याची मागणी केली आहे.

Pune Rape Case : पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट परिसरातील शिवशाही या एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेनतंर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी एक मागणी केली आहे.
आमदार निलेश राणे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुणे बलात्कारप्रकरणी विचारणा करण्यात आली. यावेळी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एन्काउंटर स्कॉड परत आणा, अशी मागणी केली आहे.
“ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. यावर फडणवीस साहेब योग्य ती कारवाई करतीलच याची मला खात्री आहे. पण इथून पुढे अशा घटना होऊ नये, यासाठी काहीतरी कडक शिक्षा व्हायला हवी. कारण ही घाण समाजातून गेल्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिलेला नाही”, असे निलेश राणे म्हणाले.
“एन्काऊंटर केल्याशिवाय ही लोक सुधारणार नाही”
“आम्ही नेहमी म्हणतो काही वर्षांपूर्वी एन्काऊंटर स्कॉड होता, अशा लोकांसाठी एन्काऊंटर स्कॉड परत आणण्याची वेळ आली आहे, असं वाटत आहे. एन्काऊंटर केल्याशिवाय आणि तो स्कॉड परत आणल्याशिवाय ही लोक सुधारणार नाही. जोपर्यंत जीवाची भीती नाही तोपर्यंत हे असेच गुन्हे करत राहणार. त्यांच्या मनात भीती नाही. ते कोणत्यातरी नशेत आहेत”, असेही निलेश राणेंनी म्हटले.
“पुन्हा एन्काऊंटर स्कॉड आणा”
“ज्यांच्या डोक्यात हे असे विचार येतात, त्यामुळे आता समाजात हे असले लोक नको. त्यामुळे मी विनंती करणार आहे की एन्काऊंटर स्कॉड परत आणा. काही एन्काऊंटर स्पेशालिस्ट तयार करा. त्यांच्यावर काही बंधने घाला. अशा लोकांना समाजात ठेवणं हे योग्य नाही. एकदा जेलमधून बाहेर आल्यानंतर ते परत तेच करणार आहेत. मी फडणवीस साहेबांना पुन्हा एन्काऊंटर स्कॉड आणा अशी विनंती करणार आहे”, असेही निलेश राणे म्हणाले.