नमस्ते इंडिया ! 38 देशांचे प्रतिनिधी पुण्यात, मराठमोळ्या पद्धतीने धुमधडाक्यात वाजतगाजत स्वागत
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा पुण्यात जी-20 परिषदेच्या उद्घाटनाला उपस्थित आहेत. या परिषदेतील एका परिसंवादात नारायण राणेही भाग घेणार आहेत.
पुणे: पुण्यात आजपासून दोन दिवसीय जी-20 परिषदेची बैठक सुरू होत आहे. या बैठकीसाठी विविध देशातील 38 प्रतिनिधींना कालच पुण्यातील लोहगाव विमानतळावर हजेरी लावली. यावेळी या परदेशी पाहुण्यांचं खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. या परदेशी पाहुण्यांना खास फेटे बांधून ढोलताशे वाजवत त्यांचं स्वागत करण्यात आलं. हा मरामोळा पाहुणाचार पाहून परदेशी पाहुणेही भारावून गेले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने भारावलेल्या परदेशी पाहुण्यांनी थेट मराठीत नमस्ते इंडिया म्हणत पुणेकरांचे आभारही मानले.
पुण्यात आजपासून जी-20 समुहाची बैठक होत आहे. या बैठकीला देशविदेशातील पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी कालच विविध देशातील 38 प्रतिनिधींनी पुणे गाठलं. त्यामुळे या पाहुण्यांचं विमानतळावरच जंगी स्वागत करण्यात आलं.
या प्रतिनिधींचं विमानतळावर आगमन होताच त्यांना पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. महिलांनी पारंपारिक पद्धतीने या पाहुण्यांना ओवाळलं. त्यानंतर तूतारी वाजवून या पाहुण्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
यावेळी ढोलताशेही वाजवण्यात आले. अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने झालेलं स्वागत पाहून हे परदेशी पाहुणेही भारावून गेले. या प्रतिनिधींनी नमस्ते इंडिया असं म्हणत पुणेकरांचं आभार मानलं.
जी-20 समुहाच्या बैठकीसाठी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं ढोलताशे वाजवून स्वागत केलं जात आहे. त्यासाठी प्रशासनाने भरजरी पोशाखातील ढोल ताशा वादक, तूतारी वादक तैनात ठेवले आहेत. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.
विमानतळापासून ते परिषदेच्या ठिकाणापर्यंत ‘वसुधैव कुटुंबकम’च्या संकल्पनेचे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात परिषदेची चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. या शिवाय या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
या परिषदेसाठी विविध देशातील प्रतिनिधी आले आहेत. इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँडआणि स्वित्झर्लंड आदी सदस्य देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत.
त्याशिवाय कोएलीशन फॉर डिझास्टर रेझीलीयंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन आणि एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींनींही परिषदेसाठी हजेरी लावली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा पुण्यात जी-20 परिषदेच्या उद्घाटनाला उपस्थित आहेत. या परिषदेतील एका परिसंवादात नारायण राणेही भाग घेणार आहेत. त्यामुळे या परिषदेतील चर्चेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.