Pune crime : शाळा प्रशासनाला भोवला हलगर्जीपणा! चासकमान धरणात 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मृत्यू होण्याचा धोका असूनही प्रशासन आणि शिक्षकांनी मुलांना अशा ठिकाणी नेऊन धोका पत्करला. याबाबत तामिळनाडू येथील मृत विद्यार्थाचे पालक डी. धनशेखर यांनी शाळा प्रशासन आणि संबधित चार शिक्षकांविरूद्ध खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
खेड, पुणे : पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणी चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील चासकमान धरणामध्ये (Chaskaman Dam) चार विद्यार्थी पोहायला गेले होते. त्यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, चौघांचे मृतदेह त्यांच्या हाती लागले. ते त्यांना वाचवू शकले नाहीत. या प्रकरणी कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या सह्याद्री स्कूल (Sahyadri School) प्रशासन आणि संबधित चार शिक्षकांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी याविषयीची माहिती दिली आहे. खेड (Khed) तालुक्यातील चासकमान धरणाच्या पाण्यात 19 मे रोजी सह्याद्री स्कूलमधील 32 विद्यार्थी आणि 4 शिक्षक शाळेलगतच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते.
दुर्दैवी घटनेत चौघांचा मृत्यू
परिक्षीत कुलदीप अगरवाल (वय 16, रा. नवी दिल्ली), नव्या प्रज्ञेश भोसले (वय 16, रा. खारघर, नवी मुंबई ), रितीन डी. धनशेखर (वय 16, रा. ईरोड, कोईम्बतूर, तामिळनाडू), तनिशा हर्षद देसाई (वय 16, रा. बावधन, पुणे) हे चार विद्यार्थी मात्र खोल पाण्यात गेल्यामुळे गटांगळ्या खाऊन बुडाले. त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळा प्रशासन आणि संबंधित शिक्षकांचा बेजबाबदारपणा उघडकीस आला.
दोषारोपपत्र दाखल होणार
मृत्यू होण्याचा धोका असूनही प्रशासन आणि शिक्षकांनी मुलांना अशा ठिकाणी नेऊन धोका पत्करला. याबाबत तामिळनाडू येथील मृत विद्यार्थाचे पालक डी. धनशेखर यांनी शाळा प्रशासन आणि संबधित चार शिक्षकांविरूद्ध खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. या घटनेचा अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी दिली आहे.
नेमके काय घडले?
पुण्याच्या खेड तालुक्यातील चासकमान धरणात पोहायला गेलेल्या 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी सह्याद्री स्कूलचे होते. गुंडाळवाडी येथील तिवई हिल परिसरात सह्याद्री स्कूल आहे. या ठिकाणी निवासी विद्यार्थी असतात. शाळेला सुट्टी लागणार असल्याने 10 वीच्या वर्गात शिकणारे चौघे तिवई हिलच्या पायथ्याशी असलेल्या चासकमान धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोठ्या लाटेसोबत ते पाण्यात बुडाले. परिक्षित अग्रवाल, रितीन डीडी, तनिशा देसाई आणि नव्या भोसले अशी या विद्यार्थ्यांची नावे होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र, चौघांचे मृतदेह त्यांच्या हाती लागले.