पुणे: राज्यातील जनतेला काळजीत टाकणारी आणखी एक बातमी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे 4 तर मुंबईत 3 रुग्ण सापडले आहेत. राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 रुग्ण सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेले चारही रुग्ण नायजेरियावरून आलेल्या ओमिक्रॉन बाधित महिलेचे नातेवाईक आहे. या सात पैकी चार रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले होते. एका रुग्णाने लसीचा एकच डोस घेतला होता. तर एका रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. लसीकरण न झालेला बालक साडेतीन वर्षाचा आहे. विशेष म्हणजे यातील चारही रुग्णांना कोणतेही लक्षण आढळून आले नाहीत. तर तीन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळले आहेत.
आज चार रुग्ण सापडल्याने पिंपरी-चिंचवडमधील ओमिक्रॉन रुग्णाचा आकडा दहावर जाऊन पोहचला आहे. यापैकी चार रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. त्यांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे सध्या ओमायक्रोनच्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 22 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
दरम्यान, मुंबईत आढलेल्या तिन्ही रुग्णांपैकी एक ४८ वर्षीय रुग्ण टांझानिया येथून 4 डिसेंबर रोजी आला होता. 4 डिसेंबर रोजी त्याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये सदर व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीकरण शिल्लक आहे. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. सदर रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील दोघांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही.
दुसरा रुग्ण 25 वर्षीय व्यक्ती आहे. तो लंडन येथून 1 डिसेंबर रोजी भारतात आला. त्याची कोविड चाचणी बाधीत आल्याने त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लसीचे दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. सदर रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविड बाधित नाही. तिसरा व्यक्ती 37 वर्षीय पुरुष (गुजरातचा रहिवासी) आहे. तो दक्षिण आफ्रिका येथून 4 डिसेंबर रोजी आला होता. ज्याची कोविड चाचणी केली असता रुग्णास कोविडची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याचा सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 10 December 2021 pic.twitter.com/xTRy85WA1r
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 10, 2021
संबंधित बातम्या:
Omicron : मुंबईची धडधड वाढली, धारावीत एकजण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह!