महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी, प्रभाग रचनेसाठी पिंपरीत समिती नियुक्त
सर्व महापालिकांना आपापल्या शहरांमध्ये कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामही सुरू झालं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
पिंपरी : आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक (Pimpri Chinchwad Municipal Corporation Elections) ही एक सदस्य एक प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) आदेश दिले आहेत. सर्व महापालिकांना आपापल्या शहरांमध्ये कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामही सुरू झालं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. (A committee has been appointed for the formation of model wards of Pimpri Chinchwad Municipal Corporation)
25 अधिकाऱ्यांची समिती करणार प्रारूप प्रभाग रचना
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या नियंत्रणाखाली 25 अधिकाऱ्यांची समिती महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना करणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये निवडणूक होणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर ही प्रभाग रचना केली जाणार आहे. प्रभाग रचना करताना संपूर्ण गोपनीयता पाळावी, वेळेत काम पूर्ण करावे आणि नियमांचं काटेकोर पालन करावं अशा सूचना आयुक्तांनी समितीला दिल्या आहेत.
वॉर्डांची संख्या 32 वरून 128 होणार
नव्या प्रभाग रचनेसाठी 2011 च्या लोकसंख्येचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या आता आहे तेवढीच म्हणजे 128 कायम राहणार आहे. सध्या शहरात एका वॉर्डात चार सदस्य आहेत. मात्र, प्रभाग रचना करताना चार सदस्यीय वॉर्डाऐवजी 128 वॉर्ड असणार आहेत. म्हणजेच त्यामुळे वॉर्डांची संख्या 32 वरून 128 होणार आहे.
2011 च्या जणगणनेनुसार ठरणार प्रभाग
2021 ची जनगणना झाली नसल्याने 2011 च्या जनगणनेनुसारच ही प्रभाग रचना केली जाणार आहे. एका प्रभागात सरासरी 21 हजार 423 मतदार असणार आहेत. आयोगाच्या निकषानुसार किमान मतदारांची संख्या ही सरासरीच्या 10 टक्के कमी आणि कमाल मतदारांची संख्या सरासरीच्या 10 टक्के जास्त असू शकतात. त्यानुसार एका प्रभागात कमीत कमी 19 हजार 221 मतदार तर जास्तीत जास्त 23 हजार 565 मतदार असू शकतात.
अशी ठरणार प्रभागरचना
प्रभाग रचनेनुसार प्रभागाची सीमा ठरवताना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच प्रभाग रचना केली जाणार आहे. शहराच्या उत्तरेकडून ईशान्येकडे, त्यानंतर पूर्वेकडून पश्चिमेकडे अशाप्रकारे नैसर्गिक स्रोत, रस्ते, नाले, पूल, नदी, लोहमार्ग, महामार्ग, विचारात घेऊन प्रभाग रचना केली जाणार आहे. शेवटचा प्रभाग हा दक्षिणेकडचा असणार आहे.
एका इमारतीचे किंवा एका घराचे, एका चाळीचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. मोकळ्या जागांसह सर्व सार्वजनिक जागा या कोणत्या ना कोणत्या प्रभागात यायला हव्यात. शिवाय प्रभाग रचना करताना रस्ते, नद्या, नाले, सिटी सर्व्हे यांच्या नंबरला उल्लेख करणं गरजेचं आहे.
इतर बातम्या :