sharad pawar ajit pawar meet | बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं असं काही
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा रोवत अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. तसेच भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले. असं असताना आता शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक पार पडली. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाली. सत्तेत सहभागी व्हावं असा प्रस्ताव अजित पवार यांच्याकडून देण्यात आला. जयंत पाटील यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव अजित पवार यांनी पाठवला होता. हा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला असून याबाबत माध्यमांना स्वत: स्पष्टीकरण देणार असल्याचं सांगितलं जात आहे. बंडानंतर झालेल्या पहिल्याच गुप्त भेटीनं राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या भेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. माध्यमांना चुकवत अजित पवार आणि जयंत पाटील बैठकीला पोहोचले होते. या भेटीबाबत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
काय म्हणाले महाविकास आघाडीचे नेते?
“आमच्यासोबत असलेल्या पक्षांच्या संघटनात्मक चर्चेत आम्हाला पडण्याचं काही कारण नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे की भाजपाच्या विरोधात ताकदीने लढण्याची तयारी ठेवणाऱ्या लोकांना आम्ही बरोबर घेऊन चालणार आहोत. अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे कोण कुठे भेटलं याच्याशी आम्हाला काही घेणं नाही.”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.
राहुल गांधी आणि त्यांची भेट झाल्याची माहिती माझ्याकडे आहे. पवार साहेबांनी भाजपासोबत अशी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे या गुप्त बैठकीचा अर्थ आज काढणं कठीण आहे. पण त्यांच्या मनात काय हे आज आम्ही सांगू शकत नाही. ते राष्ट्रवादीलाच माहित., असं विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
“शरद पवार यांनी चार दिवसापूर्वीच सांगितलं आहे की भाजपासोबत जाणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या त्यांच्यावर विश्वास आहे. पण अशा गुप्त भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. “, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं.
शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातील बैठक एका हॉटेलमध्ये ठरली होती. मात्र त्यानंतर हे ठिकाण बदलण्यात आलं. तिघांमधील बैठक व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या घरी ठरली. अतुल चोरडिा हे शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या जवळचे मानले जातात. गुप्त बैठकीचा कोणालाही सुगावा लागू नये यासाठी जयंत पाटलांनी कार्यकर्त्याच्या गाडीचा वापर केला. पण पवारांनी स्वत:चीच गाडी वापरली.