EXCLUSIVE | शरद पवार पुणे विमानतळावर दाखल होताच पाठोपाठ अजित पवार आले, आणि…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. ते दिल्लीला जाण्यासाठी आज संध्याकाळी पुणे विमानतळावर दाखल झाले. यावेळी अनोखा प्रसंग बघायला मिळाला. कारण त्याचवेळी अजित पवार देखील विमानतळावर दाखल झाले.
पुणे | 1 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला शरद पवार हे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी जाऊ नये, असं आवाहन महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी केलं होतं. पण तरीही शरद पवार या कार्यक्रमाला गेले. या कार्यक्रमानंतर आता शरद पवार दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार दिल्लीला जात असताना एक अनोखा प्रसंग बघायला मिळाला.
शरद पवार दिल्लीला जाण्यासाठी आज पुणे विमानतळावर दाखल झाले. त्यांनी विमानतळात प्रवेश केल्यानंतर अजित पवार पुणे विमानतळावर दाखल झाले. त्यांनी शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यकाकडे शरद पवारांची विचारणा केली. साहेब आत आहेत का? अशी विचारणा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यकाकडे केली.
नेमकं काय घडलं?
शरद पवार आज दिवसभराचे दौरे आटोपून मोदी बागेतून पुणे विमानतळावर दाखल झाले होते. खरंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार होते. जसे शरद पवार पुणे विमानतळावर दाखल झाले त्याचवेळी पुणे विमानतळाच्या D1 गेटवर अजित पवार यांचा ताफा मुंबईला जाण्यासाठी आला. यावेळी शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक आणि इतर सुरक्षा रक्षक तिथेच थांबून होते. यावेळी अजित पवार आणि शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक यांच्यात एक मिनिटे चर्चा झाली. अजित पवारांनी शरद पवार यांच्याबाबत विचारणा केली. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.