सुनिल थिगळे, आंबेगाव, पुणे | 22 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी दुर्घटनेस आता दोन दिवस झाले. या ठिकाणी मृतांची संख्या २२ वर गेली आहे. डोंगरमाथ्यावर असलेल्या या गावात अजूनही बचावकार्य पूर्ण झालेले नाही. शंभरापेक्षा जास्त नागरिकांची माहिती अजून मिळालेली नाही. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमने शनिवारी पुन्हा मदत अन् बचावकार्य सुरु केले आहे. ढिगाऱ्याखाली नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रचंड ढिगारा असल्याने हा ढिगारा हटवण्याचं आव्हान रेस्क्यू टीमसमोर आहे. यापूर्वी नऊ वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील माळीणमध्ये अशीच दुर्घटना घडली होती. या घटनेच्या आठवणी पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर राहणाऱ्या लोकांना रात्री झोपू देत नाही.
इर्शाळवाडी घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील डोंगर कुशीत वसलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही कायम आहे. इर्शाळवाडीवर दुर्घटनेनंतर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पसारवाडी येथील नागरिक जीव मुठीत धरून सध्या वास्तव्य करत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. डोंगर कुशीत वसलेले आदिवासी नागरिक पाऊस सुरू झाला की दरड कोसळण्याच्या भीतीने रात्र रात्र झोपत सुद्धा नाही.
पाऊस सुरु झाली की आमच्या मनात भीती निर्माण होते. प्रशासन पाऊस आला की फक्त आमच्याकडे येतात. त्यानंतर येत नाही. आमचे अजून पुनर्वसन झालेले नाही. त्याकडे शासनाने पाठ फिरवली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या ठिकाणी महिनाभर लाईट नसते, पाणी नसते, अशी तक्रार नागरिकांनी केली. अधिकारी म्हणतात, पुनर्वसन होणार आहे? परंतु कधी होणार. हा प्रश्न नागरिक विचारत आहे. त्याचे उत्तर मिळत नाही. आंबेगाव तालुक्यातील माळीणच्या कुशीत वसलेली पसारवाडी वाडीतील नागरिकांमध्ये भीती कायम असल्याचे दिसत आहे.
इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वक्तव्य केले होते. पावसाचा पॅटर्न बदलला असल्याचे ते म्हणाले होते. तसेच इर्शाळवाडी हा भूस्खलन क्षेत्रात नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे ढोंगरमाथ्यावर वसलेल्या गावांसंदर्भात अधिक शास्त्रीय पद्धतीने पाहणी होणे गरजेचे आहे.