दरड कोसळल्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेणार, वाहतूक किती वेळ राहणार बंद?
Pune News : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळा लगत रविवारी रात्री दरड कोसळलीय होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. आता हा महामार्ग सुरळीत करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रणजित जाधव, पुणे | 24 जुलै 2023 : लोणावळा गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पुणे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून दरड हटवण्यास सुरुवात केली होती. परंतु संपूर्ण कामासाठी ब्लॉग घ्यावा लागणार आहे. ब्लॉक घेऊन महामार्ग सुरळीत करण्यात येणार आहे. यामुळे दोन तास हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
ब्लॉक दरम्यान काय असणार पर्याय
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर रविवारी रात्री सुमारे १०.३० वाजता दरड कोसळली. त्यानंतर हा रस्ता बंद झाला होता. आयआरबी, देवदूत यंत्रणा, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी काम सुरु केले होते. दरड हटवण्यास सुरुवात केली होती. परंतु रस्ता पूर्ण मोकळा करण्यासाठी ब्लॉग घ्यावा लागणार आहे. यामुळे सोमवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान वाहतूक जुन्या पुणे मुंबई मार्गाकडे वळवली जाणार आहे.
जुन्या मार्गावर कोंडी होण्याची शक्यता
दरड कोसळल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली आहे. ती सुरळीत करण्यासाठी ब्लॉक घेऊन काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक जुन्या मुंबई-पुणे मार्गावरुन वळवली जाणार आहे. दोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच ठिकाणी आल्यामुळे वाहतूक कोंडी होणार आहे. परंतु ही कोंडी दूर करण्यासाठी महामार्ग पोलीस जुन्या मार्गावर असणार आहे. वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
२४ तासांत १५६ मिमी पाऊस
लोणावळा परिसरात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस होत आहे. लोणावळा धरण परिसरात गेल्या २४ तासांत १५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत २.१२ दलघमी आवकाची नोंद झाली आहे. सकाळी ७:०० वाजता धरणात ९.७६ दलघमी जलाशय साठा झाला आहे. पाऊस असाच राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून इंद्रायणी नदी पात्रात विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.