Ajit Pawar : 40 लोकांना मंत्रिपदाची गाजरं दाखवल्यावर अडचण होणारच, मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने लोकांचे कामं रखडली आहेत. तसेच अधिवेशनही रखडलं आहे, जर तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तर मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरताय, असा थेट सवाल विचारताना अजित पवार दिसून आले.
पुणे : राज्यात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन तब्बल 36 दिवस उलटले, तरी अजून मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाहीये. यावरूनच आता अजित पवार (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार घसरले आहेत. एकनाथ शिंदे सोबत आलेल्या चाळीस आमदारांना (Shivsena MLA) जर मंत्रीपदाची गाजर दाखवले असतील तर आता ऐनवेळी अडचण होणारच ना, अशी घनाघाती टीका अजित पवारांनी आज पुण्यातून केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत अजित पवार हे मंत्रिमंडळ विस्तारावरून एकनाथ शिंदे आणि भाजपला डीवचलत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने लोकांचे कामं रखडली आहेत. तसेच अधिवेशनही रखडलं आहे, जर तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तर मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरताय, असा थेट सवाल विचारताना अजित पवार दिसून आले.
तुम्ही किती वाऱ्या करताय लोक बघत आहेत
तर तुम्ही किती वेळा दिल्ली वारी करत आहात ते जनता बघत आहेत ,सगळ्या चाळीस लोकांना तुम्ही मंत्री पदाची गाजरं दाखवली असतील. तर अडचण निर्माण होणारच. पण जे आहे ते राज्यातील जनतेला कळू दे, पत्रकारांना समजू दे तो सर्वांचा अधिकार आहे, पेट्रोल डिझेलचे भाव एक सारखे केलेत आता सीएनजी ही तेवढाच महाग केलाय, सर्वसामान्य माणसाला प्रचंड त्रास होत आहे, तर शिवसेना पक्ष जेव्हा जेव्हा फुटला त्यावेळी जे फुटले ते निवडणूकित पराभूत झाले, असा इशारा त्यांनी बंडखोरांना पुन्हा दिलाय.
कुणाला काय आश्वासनं मिळाली?
सध्याच्या सरकार मध्ये काहींना मंत्री, महामंडळ मिळेल ,काहींना पुन्हा तिकीट देण्यासंदर्भात बोलणं झालं, काहींना तुमचा सर्व खर्च करण्यात येईल अशी दबक्या आवाजात चर्चा आहे, त्यामुळे ते तिथं गेले, असा खोचक टोलाही या बंडावरून अजित पवारांनी लगावाल आहे. याच मुद्द्यावरून अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
तुम्हाला वेगळा न्याय का?
तसेच ह्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला ,सरपंच जनतेतून मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर सुद्धा जनतेतून निवडून द्या, असे आव्हान अजित पवारांनी दिलंय. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका नगरपरिषद, जिल्हा परिषद याठिकाणी प्रशासकांना अधिकार देता तसे तुमचे पण अधिकार सुद्धा मुख्य सचिवांना द्या आणि घरी बसा, एकाला एक न्याय तुम्हला वेगळा न्याय, अशीही टीका अजित पवारांनी केलीय.