अजित पवार यांना भर कार्यक्रमात मागावी लागली माफी, नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज भर मंचावर त्यांच्याच एका विधानामुळे माफी मागावी लागली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास ती चूक आणून दिली. त्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
रणजित जाधव, Tv9 प्रतिनिधी, पुणे | 2 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी त्यांचं भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचं भूमीपूजन झालं. यावेळी अजित पवार यांनी भाषण करताना संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना नंतर माफी मागावी लागली. छत्रपती संभाजी महाराज हे एकही निवडणूक लढले नाहीत, असं अजित पवार यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करेक्शन सांगितलं. त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या त्या वक्तव्यावर माफी मागितली. आपल्याला लढाई म्हणायचं होतं, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. लोकसभेच्या निवडणुकांमुळे आपल्या तोंडी चुकून निवडणूक हा शब्द आल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
विशेष म्हणजे अजित पवार हे त्यांच्या सहकाऱ्यांवरही संतापले. भाषणाचे कागदपत्रे खालीवरती झाल्याने अजित पवार भर कार्यक्रमात संतापले. “बरेच दिवस मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो होतो की, आचारसंहिता सुरु होण्याच्या आत आपण संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम घ्यावा जेणेकरुन आपल्याला मदत होईल. संभाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमीपूजन कार्यक्रमाचं वेळेस… लोचनताई शिवल्यांनी काय शेतजमीन उपलब्ध करुन दिली? हे कुणी दिली? अरे सभा मंडपाची, मला वाटलं तिथली दिली. काय कुठल्या चिठ्ठ्या पाठवाल कळायचं नाही”, अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले, मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचे धन्यवाद मानतो. हे स्मारक तयार होत असताना तुमच्या काही सूचना आणि कल्पना असतील आम्हाला वेळीच ते लक्षात आणून द्या. वेगळी काहीव प्रश्न निर्माण होतील, अशा प्रकारची गोष्ट कुणाच्याही हातून घडता कामा नये ही अपेक्षा मी भूमीपूजन कार्यक्रमाच्या दिवशी करतो. मी कंत्राटदाराला सांगतो की, दर्जेदार काम झालं पाहिजे की आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. महाराज आपल्या स्वत:च्या आयुष्यात एक सुद्धा निवडणूक हारले नाही, अशाप्रकारचा इतिहास आहे. त्यांचं स्मारक आज वढू आणि तुळापूरला होतंय. त्याचं खूप समाधान मला आणि जनतेला आहे”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी मागितली माफी
यावेळी एक जण अजित पवार यांच्याजवळ आलं. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कानात करेक्शन सांगितलं. यावेळी अजित पवार यांनी माफी मागितली. “सॉरी ते मी राजकारणामुळे निवडणूक म्हटलं. ते लढाई हारले नाहीत. लोकसभेच्या निवडणुकी आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकींशिवाय काय कळत नाही. पण आमच्यामध्ये एक निष्णांत देवेंद्र फडणवीस आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे लक्षात आणून देतात. धन्यवाद देवेंद्रजी. असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या. आमचं कार्यक्रमाला येतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलणं चाललं होतं. पण चुकून शब्द गेला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. संभाजी महाराज यांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभं करताना राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो”, अशा शब्दांत अजित पवारांनी माफी मागितली.