‘पाटील बाईला बोलवायचं का?’, अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून नेमकं काय म्हणाले? पाहा
गावाकडच्या जत्रा आणि इतर कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटील आणि तिच्या टीमला मोठी मागणी आहे. एरव्ही दरवर्षी जिथं मराठी अभिनेत्रींना बोलावलं जायचं, तिथं आता गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित होतायत.
पुणे : कोणत्या ना कोणत्या कारणानं गौतमी पाटील चर्चेत राहतीय. बारामतीत एक कार्यक्रम होता. एका लग्नाच्या तिथीवरुन विषय सुरु असताना समोरच्या कार्यकर्त्यानं विषय छेडला आणि नंतर अजित पवारांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवायचा का? म्हणून टोला मारला. याआधी नृत्यावेळी अश्लील हावभावांमुळे अजित पवारांनी नाव न घेता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर आक्षेप घेतला होता. राष्ट्रवादीचेच काही पदाधिकारी पक्षाचं बोर्ड लावून कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे अजित पवारांनी त्याबद्दल नाराजीही वर्तवली होती. मात्र आपण फक्त लावणीच नाही तर नृत्याचे इतर सर्व प्रकार सादर करतो आणि नृत्यावेळी अश्लिल हावभाव पूर्णपणे बंद केल्याचं गौतमी पाटीलनं म्हटलं होतं.
गावाकडच्या जत्रा आणि इतर कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटील आणि तिच्या टीमला मोठी मागणी आहे. एरव्ही दरवर्षी जिथं मराठी अभिनेत्रींना बोलावलं जायचं, तिथं आता गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित होतायत. म्हणूनच नेत्यांपासून कीर्तनकारांपर्यंत आणि अभिनेत्रींपासून ते तमासगिरांपर्यंत अनेकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर टीका केली होती.
प्रेक्षकांनी लावणी बंद पाडली
इतकंच काय जे एरव्ही कोणत्याही मुद्द्यावर थेटपणे भूमिका घेण्यापासून लांब राहतात. ते ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरेंनी सुद्दा गौतमी पाटीलबद्दल आपली भूमिका मांडली. गौतमी पाटीलच्या नृत्यावर आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे की लावणी अश्लील नृत्यप्रकार नाहीय. यावर गौतमीचं म्हणणं आहे की तिचा नृत्यप्रकार हा सरसकट लावणी म्हणून मोडत नाही आणि दुसरीकडे काल-परवा पुण्यातल्या एका गावात कलाकारांनी जी लावणी सादर केली, ती प्रेक्षकांनी बंद पाडत गौतमी पाटील सारखीच लावणी सादर करा म्हणून आग्रह धरला.
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर टीका केली आहे. दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोकं नावं ठेवतात. गौतमी पाटील हिने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोकंही इंदुरीकर महाराजांना नावं ठेवतात, असे सदानंद मोरे यांनी म्हटले आहे. यामुळे दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी खोचक टीका सदानंद मोरे यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय.