‘बदल करायचाय, मी आत्ताच कॉन्ट्रॅक्टरला झाडलं’, डॅशिंग अजित पवार भर भाषणात काय म्हणाले?
"स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. एका जीवाने राहा. सहकार खाते कोणाकडे जाते हे मी बघत होतो. सुदैवाने सहकार खातं आपल्याकडे आहे. चर्चा झाली का नाही नुसतं जॅकेट घालून फिरतो. आता मी जॅकेट सोडले. तू घातलं काय?" असं म्हणत अजित पवार यांनी आमदार ज्ञानेश्वर कटके यांना मिश्किल टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे जिल्ह्यातील तुळापूरच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी यावेळी मतदारांचे आभार मानले. तसेच त्यांनी आपल्या आगामी विकासकामांविषयी जनतेला माहिती दिली. “सहाव्यांदा राज्याच्या जनतेने मला उपमुख्यमंत्री केल्यामुळे अनेक लोक मला भेटत होते. कुठल्याही कामात मी लक्ष जर घातलं तर ते बारकाईने आणि दर्जेदार झालं पाहिजे, अशी माझी भुमिका असते. आपलं पुणे बदलतंय. चिंचवड बदलत आहे. शेतकऱ्याची पोरं व्यवसायामध्ये पुढे येत आहेत. एम एच बाराचा मतितार्थ काय आहे हे मला कळलं नाही. स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या मावळ्यांना माझं अभिवादन आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“भीमा कोरेगाव येथे अनुयायांनी गैरसोय होऊ नये म्हणून आढावा बैठक आज घेतली आहे. दिवस मावळायच्या आत मला तुळापूरच्या सर्व गोष्टी पाहिजे होत्या. तुळापूरला मी बराच वेळ दिला. सुदैवाने मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यामुळे राज्य पुढे नेहण्यासाठी जबाबदारी माझ्याकडे राहणार आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“तुळापूरचा बदल करायला आहे. कॉन्ट्रॅक्टरला आताच मी झाडलं. तुमच्या जिल्ह्याने महायुतीचे सरकार येण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून दिले. तुळापूरमध्ये थ्री लेनचा पूल तयार करणार आहे. तुळापूरसाठी जबरदस्त रस्ता करणार आहे. सोलापूर रोड, नगर रोडचा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागे लागून सोडविणार. निकालानंतर पहिल्यांदाच या परिसरात आलो आहे. 40 कोटींचा पूल तुळापूर येथे उभारणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहण्यासाठी अनेक चांगली कामं तिथ करणार आहे. विंग गॅलरी या ठिकाणी उभारणार आहे. तुम्ही माझं ऐकलंय, आता मी तुमचं ऐकणार. मी 264 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देत आहे. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.
‘नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची’, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. एका जीवाने राहा. सहकार खाते कोणाकडे जाते हे मी बघत होतो. सुदैवाने सहकार खातं आपल्याकडे आहे. चर्चा झाली का नाही नुसतं जॅकेट घालून फिरतो. आता मी जॅकेट सोडले. तू घातलं काय?” असं म्हणत अजित पवार यांनी आमदार ज्ञानेश्वर कटके यांना मिश्किल टोला लगावला. “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेतूनच राज्यातील काम होईल. कष्ट घेतले तर फळ भेटतं. बाप जाद्याच्या जमिनी विकू नका. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकादिलाने कामाला लागा. नव्या चेहऱ्याला संधी द्यायची आहे”, असं महत्त्वाचं वक्तव्य अजित पवारांनी केलं.