अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 24 डिसेंबर 2023 : मी पहाटे लवकर उठून काम करतो. तरीही वेळ पुरत नाही. आज पहाटे 6 वाजता उठलो. एक कार्यकर्ता कागद घेऊन आला. आमदार झोपलेले असतील. तेव्हा माझ्याकडे लोक काम घेऊन येतात. आज एक महिला भगिनी माझ्याकडे आली आणि म्हणाली, दादा खराडवाडीत कॉलेज काढा. मी म्हणालो, खराडवाडीत कॉलेज कसं निघणार? इतकं छोटं गाव आहे. इतकी छोटी खेराडवाडी. मुलं-मुली आणायची कुठून? तर ती म्हणाली, दादा तीही तुम्हीच आणा. आयला म्हटलं माझं वय झालं नाही तर मी आणलीच असती, असं मिश्किल विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करताच एकच खसखस पिकली.
अजितदादा गटाचा बारामतीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचाचा अजितदादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी हे मिश्किल भाष्य केलं. आता इथून पुढे फक्त माझंच ऐका. बाकी कुणाचं ऐकायच नाही. बाकीच्यांच लय वर्ष तुम्ही ऐकलं. आता माझं ऐका. बऱ्याच जणांनीही त्यांचं ऐकलं. आम्ही वरिष्ठांना अनेकदा सांगितलं की, आजपर्यंत आम्ही तुम्ही म्हणाल तसं वागलो. तुम्ही सांगाल ती कामे केली. आता वय झालं. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे, अशी टीका अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली.
बारामतीकरांनी मला आशीर्वाद दिला आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठी आहात. तोपर्यंत मी कामाला कुठेही कमी पडणार नाही. मी माझं काम चोख करेन. कुणालाही काही कमी पडणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सत्तेत असू तर आपण कामे करू शकतो. तुमच्या आशीर्वादाने आज मी राज्यात सत्तेत आहे. जर मी आज सत्तेत नसतो तर कामे करायला जमलं असतं का? मला तुम्हची सांगा, असं ते म्हणाले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उंचीचा नेता देशात नाही. तुम्ही मल्लिकार्जुन खरगे आणि नरेंद्र मोदी यांना एकत्रित उभं करा. मला सांगा पंतप्रधान म्हणून तुम्ही कुणाला मतदान करणार? असा सवाल करत अजितदादांनी मल्लिकार्जुन खरगे यांची खिल्ली उडवली.
राज्यात कसा कौल लागला हे आपण पाहिले आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. पण नंतर निवडून आलेले सरपंच पक्ष आणि नेते सांगतात. पहिल्या क्रमांकावर भाजप, दुसऱ्या क्रमांकावर आपला राष्ट्रवादी पक्ष आला, तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातला पक्ष आला. बाकीचे पक्ष मागे राहिले, असा टोला त्यांनी लगावला.
आपण महिलांना संधी देत आहोत. आपण चौथ महिला धोरण आणलं. अदिती तटकरेने ते सादर केलं. मूल जन्माला आले की त्याला वडिलांचं नाव दिलं जातं. त्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं लावण्याची प्रथा आहे. पण आता इथून पुढे मुलाचं नाव, त्यानंतर आईचं नाव, नंतर वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव लावलं जाणार आहे. तसा निर्णयच आपण घेतला आहे. महिलांच्या नावावर घर घेतले तर पैसे वाचतील. टॅक्स कमी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले.