चिंचवडमध्ये पराभव का झाला?, निक्कालाआधीच अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; कुणावर फोडले खापर?
कलाटे आणि नाना काटे यांची मते पाहिली तर ती मते भाजपच्या उमेदवारांपेक्षाही अधिक आहे. बंडखोरी झाली नसती तर चित्रं वेगळं दिसलं असतं. मागच्यावेळी कलाटेंना लाखभर मते मिळाली. पण यावेळी त्यांना ती मते मिळाली नाही.
पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची सकाळपासून मतमोजणी सुरू होती. त्यापैकी कसब्याचा निकाल आला आहे. कसब्यात भाजपचा पराभव झाला असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तर चिंचवडमधील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे पिछाडीवर असून त्यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, चिंचवडचा निकाल येण्याआधीच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पराभव मान्य केला आहे. राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यामुळेच हा पराभव झाला आहे, असं म्हणत अजित पवार यांनी बंडखोरीचं सर्व खापर राहुल कलाटे यांच्यावर फोडलं आहे.
निवडणूक निकालानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कसब्यातील विजयाची आणि चिंचवडमधील पराभवाची कारणमिमांसा केली. कसब्यात आणि चिंचवडमध्ये मी प्रचार करत होतो. चिंचवडमध्ये प्रचार करत असताना मला काही माहिती येत होती. राहुल कलाटे यांना सत्ताधारी कशी मदत करत होते, याची मला माहिती येत होती. सत्ताधाऱ्यांनी कलाटे यांना मदत केल्यामुळेच आमचा पराभव झाला. मी कलाटे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं अनेकवेळा आवाहन केलं होतं. आता नानाला संधी देऊ असं मी त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही, असं अजित पवार म्हणाले.
जागा वाटप व्यवस्थित व्हावं
या पुढे आता जागा वाटप करताना ते व्यवस्थित केलं पाहिजे. महाविकास आघाडीने व्यवस्थित जागा वाटप केलं पाहिजे. आतापासूनच तयारी केली पाहिजे. तरच पुढे महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल, असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी कसब्यातील विजयाचं स्वागत केलं. कसब्यातील विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असल्याचं अजित पवार म्हणाले. तसेच सर्व सामान्यांना भेटूनही कसब्यातील भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
कलाटेंमुळे पराभव
कलाटे आणि नाना काटे यांची मते पाहिली तर ती मते भाजपच्या उमेदवारांपेक्षाही अधिक आहे. बंडखोरी झाली नसती तर चित्रं वेगळं दिसलं असतं. मागच्यावेळी कलाटेंना लाखभर मते मिळाली. पण यावेळी त्यांना ती मते मिळाली नाही. पण त्यांनी स्वत:ची मते घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असं त्यांन ीस्पष्ट केलं.
ही माणुसकी आहे काय?
शिंदे-फडणवीस यांनी कसब्यात नेतृत्व केलं तरीही त्यांचा पराभव झाला. गिरीश बापट यांची तब्येत बरी नव्हती. नाकाला ऑक्सिजन असतानाही त्यांना प्रचारात आणलं. आरोग्यापेक्षा भाजपने निवडणूक महत्त्वाची समजली. ही माणुसकी आहे का? असा सवाल करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो केले. मोठ मोठ्या सभा घेतल्या तरीही भाजपचा पराभव झाला, असा चिमटाही त्यांनी काढला.