शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
अजित पवार यांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणावर आज प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पुण्याचा पालकमंत्री म्हणून आपलं या प्रकरणाकडे लक्ष आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. तसेच या प्रकरणी पोलिसांचा सखोल तपास सुरु असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
पुणे | 6 जानेवारी 2024 : पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची भर दिवसा हत्या करण्यात आली. शरद मोहोळची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “पुण्यात काल एक घटना घडली होती. पण पोलिसांनी ताबोडतोब जे कुणी दोषी होते त्यापैकी अनेकांना पकडलं आहे. पोलिसांनी दोन-तीन तासांपूर्वी पत्रकार परिषद देखील घेतली आणि सर्व वस्तूस्थिती सांगितली. पोलिसांचा पुढचा तपास सुरु आहे”, असं अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. आपलं पुण्यातील सर्व घडामोडींकडे पालकमंत्री म्हणून बारकाईने लक्ष आहे, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
अजित पवार यांना यावेळी शरद मोहोळ हत्या प्रकरणाविषयी आणखी काही माहिती पत्रकारांनी विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर अजित पावर यांनी फार बोलण्यास नकार दिला. “या प्रकरणाचा तपास झाल्याशिवाय, संपूर्ण कागदपत्र पुढे आल्याशिवाय मील त्याबद्दल बोलणं उचित नाही, मी एवढंच तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या संदर्भात जी काही वस्तूस्थिती आहे ती लोकांसमोर आणली जाईल. तशा पद्धतीने एफआयआर दाखल केली जाईल”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
पुण्यातल्या विकासकामांबद्दल अजित पवार म्हणाले?
“माझं सतत पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने लक्ष असतं. महाराष्ट्रासाठी तर काम करतच असतो, ती आमची जबाबदारी असते. पण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर विकासाच्या बाबतीत पाठीमागे राहू नये, यासाठी प्रयत्न सुरु असतात. निगडीपर्यंत मेट्रोचं स्टेशन मंजूर झालं आहे. मेट्रोचं स्टेशन अण्णा बनसोडेला पाहिजे होतं. नागरिकांची मागणी होती. ती पण आम्ही पूर्ण करतोय. बाकीचे सुद्धा कामे चालली आहेत. अजून मेट्रोल आपल्याला पुढे नेता येईल त्याबाबतचही नियोजन आम्ही केलं आहे. शिवाजीनगरला सेशन कोर्टजवळ मेट्रोचं जंक्शन असणार आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
“काही राजकीय कार्यकर्ते कोणतीही माहिती न घेता बोलतात. उदाहरणार्थ मध्ये सांगितलं की, मेट्रोच्या बाबतीत नागपूर, मुंबईला निधी मिळाला पण पुण्याला निधी मिळाला नाही. ही धाद्यांत खोटी बातमी होती. मी सतत हा निधी देत असताना तो निधी गेला पाहिजे असा पवित्रा घेत असतो. थोडासा प्रोजेक्ट लांबला आहे, पण अवघ्या महत्त्वाच्या रस्त्याला असल्याने अडचणी येतात. मध्ये दोन वर्ष कोरोना काळामुळे गती कमी झाली होती. पण आता गतीने कामे सुरु आहेत”, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला महाराष्ट्रात येत आहेत. जवळपास 46 हजार कोटींच्या विकासकामांचं भूमीपूजन आणि उद्घाटन आहे. यामध्ये नावा-शेवा प्रकल्पाचा समावेश आहे”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.