अजितदादांना पुन्हा संधी नाही, शरद पवार यांचा थेट घाव, अजितदादा यांची पहिली प्रतिक्रिया काय?; म्हणाले…
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा संधी देणार नसल्याचं म्हटलं आहे. त्याबाबत अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी नो कमेंट्स म्हटलं आहे.
पुणे | 25 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधी अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यानंतर अवघ्या पाच तासातच शरद पवार यांनी घुमजाव केलं. अजित पवार हे आमचे नेते आहेत, असं मी म्हटलेलं नाही, असं सांगतानाच राष्ट्रवादीत फूट पडलेली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. या सर्व घडामोडींवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली. उलट अजितदादांनी पत्रकारांना कायदा आणि नियम काय सांगतो हेच सांगितलं.
अजित पवार हे मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमारच केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे? मध्ये तुम्ही दोघांनी बैठक घेतली, सुप्रिया ताई म्हणतात अजित दादा आमचे नेते आहेत, मग साहेबही आधी तुम्ही आमचे नेते म्हणतात अन् परत तुम्हाला कोणतीही संधी नाही असं म्हणतात? मग ही संभ्रमावस्था दूर कशी होणार? असा प्रश्न अजित पवार यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलं.
नो कमेंट्स म्हणण्याचा अधिकार
तुम्ही मागचं उकरून काढायला बसलाय का? ताजं काही बोलायला बसलाय? मला त्याबाबत बोलायचं नाही रे बाळा. शरद पवारांच्या वक्तव्यावर नो कमेंट्स, विकासाचे बोला. सर्व सामान्य लोकांना विकास हवाय. तुम्ही लोक जसे पाहता, त्या उलट मी पाहतो. मला विकासा व्यतिरिक्त कशावरही भाष्य करायचं नाही. तुम्हाला जसा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसा कायद्याने, संविधानाने, नियमाने मला नो कॉमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.
कुणालाही बोलावलं नव्हतं
मी आजच्या बैठकीला कुणालाही बोलवलं नव्हतं. अगदी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही बोलावलं नव्हतं. मग भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावयचा विषय येत नाही? असं अजित पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
शरद पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक घाव दोन तुकडे केले आहेत. अजित पवार यांना पुन्हा पक्षात संधी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा त्या रस्त्याला जायचं नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी द्यावी म्हणून निर्णय घेतला होता. संधी ही सारखी मागायची नसते, संधी ही सारखी द्यायची नसते, असं शरद पवार म्हणाले होते.