पुणे शहरातील राष्ट्रवादी कार्यालय अजित पवार गट ताब्यात घेणार का? काय सुरु आहेत हालचाली?
Pune Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले. त्यानंतर पुणे जिल्ह्यात मोठा बदल होत आहे. पुणे शहर अन् जिल्ह्यात दोन गट पडले आहे. आता पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासंदर्भात काय होणार?
योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात रविवारपासून अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत अजित पवार यांनी आपला स्वत:चा वेगळा गट तयार केला. हा गट म्हणजेच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केले जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदीही अजित पवार यांची निवड झाली आहे. तसेच राज्यातील सत्तेत शिवसेना-भाजपसोबत अजित पवार गट गेला आहे. त्याचवेळी दुसरीकडे शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी पक्ष चिन्ह अन् पक्षाचे नाव आपलेच असल्याचा दावा केला आहे. या सर्व घडामोडीनंतर पुणे शहरातही अनेक बदल होत आहेत.
पुण्यात काय आहे हालचाली
अजित पवार गटाकडून पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत. परंतु ते शरद पवार यांच्या गटात गेले आहेत. यामुळे अजित पवार गटाकडून दीपक मानकर यांची वर्णी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दीपक मानकर यांच्या नावाची यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर महिला शहराध्यक्षपदी रूपाली ठोंबरे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यालय कोणाचे असणार
पुणे शहरातील राष्ट्रवादी कार्यालय कोणाचे असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपण कार्यालय अजित पवार गटाच्या ताब्यात जाऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच या कार्यालयाचा करार आपल्याच नावावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे नाशिकसारखा दावा अजित पवार गटाकडून केला जाणार नाही. त्यांच्याकडून पुण्यात शहर कार्यालयाची जागा शोधण्याचे काम सुरु केले आहे. पुणे शहर कार्यालयावर अजित पवार गट दावा करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेण्यावरुन दोन्ही गटात चांगलाच वाद झाला होता. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील प्रसंग टळला. अन्यथा दोन्ही गट भिडले असते. नाशिकसारखा प्रकार पुणे शहरात होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण अजित पवार गट आपले नवीन कार्यालय शोधन आहे.