Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांच्या खात्यानंतर आता अजित पवार यांची फडणवीस यांच्यावर कुरघोडी, फडणवीस यांच्या खात्यांची घेतली बैठक
Ajit Pawar and Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बैठकांचा सपाटा लावताना इतर विभागांच्या बैठका सुरु केल्या आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याची बैठक अजित पवार यांनी घेतली आहे.
योगेश बोरसे, पुणे | 12 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत आल्यापासून आक्रमक झाले आहेत. विविध खात्यांच्या बैठका घेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉरमध्येही त्यांनी घुसखोरी केली होती. ती चर्चा चांगली रंगली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या वॉर रूममध्ये अजित पवार यांनी मागील महिन्यात ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’च्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याची बैठक त्यांनी घेतली. त्यामुळे पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे.
अजित पवार यांचा बैठकांचा धडका
अजित पवार सत्तेत आल्यापासून आक्रमक झालेले आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असताना अनेक बैठका अजित पवार यांनी घेतल्या. यामुळे चंद्रकांत पाटील नाराज होते. पुणे भाजपचे कार्यकर्तेही नाराज होते. चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. परंतु अजित पवार यांनीच मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केला होता. त्यावेळी विरोधकांनीही हा विषय उचलून धरला होता. त्यामुळे राज्यात ही चर्चा चांगलीच रंगली होती.
आता फडणवीस यांच्या कारभारात हस्तक्षेप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जा विभागाची बैठक घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या ऊर्जा विभागाची बैठक अजित पवार यांनी घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या बैठकीत महावितरणच्या प्रलंबित कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीला अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार, दिलीप मोहिते पाटील, डॉ. किरण लहामटे, संजय शिंदे, देवेंद्र भुयार, दिलीप बनकर आणि चंद्रकांत नवघरे उपस्थित होते. बैठकीला ऊर्जा विभागाचे सचिव आणि एमडीही उपस्थित होते.
पुणे पालकमंत्रीपदारुन वाद
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदावरुन भाजप आणि राष्ट्रवादीत वाद सुरु आहे. भाजपला हे पद आल्याकडे हवे आहे तर अजित पवार यांनाही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे आहे. यामुळे चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना पुण्यातील अनेक बैठका अजित पवार यांनी घेतल्या. आपणास उपमुख्यमंत्री म्हणून बैठका घेण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले होते.