Pune Water News | पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात कालवा समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
Pune Water News | यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी झाला आहे. कमी पावसामुळे राज्यातील अनेक प्रकल्प पूर्ण भरले नाहीत. त्यापार्श्वभूमीवर पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत पुण्याच्या पाण्याबाबत निर्णय झाला.
पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : देशात यंदा मान्सूनवर अलनिनोचा प्रभाव होता. यामुळे राज्यात आणि देशात सरासरी पाऊस झाला नाही. राज्यातील अनेक धरणांमध्ये जलसाठा शंभर टक्के झालेला नाही. यामुळे पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल, यादृष्टिने नियोजन करावे लागणार आहे. पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत पुणे शहराच्या पाण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. याबैठकीनंतर पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होणार का? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
काय झाला बैठकीत निर्णय
पुणे शहरावरील पाणी कपातीचा निर्णय तुर्तास टळला आहे. शुक्रवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपातीचा कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे पुणे शहराचा पाणी पुरवठा सध्या आहे तसाच कायम राहणार आहे. पाणी कपातीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुन्हा आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत पाणी कपात करायची का नाही? यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
काय म्हणाले अजित पवार
कालवा समितीची बैठक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीनंतर माहिती देताना अजित पवार म्हणाले की, पुण्याच्या धरण परिसरात चांगला पाऊस झाला आहे. परंतु यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. यामुळे उन्हाळ्यात नियोजन कसे असेल पाहिजे, यासाठी बैठक घेण्यात आली. धरणांमधील पाणी जुलैपर्यंत ठेवावे लागणार आहे. त्यामुळे आता पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. पवना धरण भरले असल्यामुळे पिंपरी चिंचवडला काही अडचण येणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
भाजप आमदारांची दांडी
पुणे शहरात पालकमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या कालवा समितीच्या महत्वपूर्ण बैठकीला भाजप आमदारानी दांडी मारली. या बैठकीला भाजपचे एकच आमदार उपस्थितीत होते. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर बैठकीला उपस्थितीत होते. पुण्यात आठ मतदारसंघापैकी दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तर एक काँग्रेसचा आमदार आहे. भाजपच्या पाच आमदार पैकी एकच आमदार बैठकीला उपस्थितीत होते.