Baramati Ajit Pawar : ‘…नाहीतर कुणाला तरी काठीनं बदडून काढाल’ ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यक्रमात अजित पवारांची टोलेबाजी
अजित पवार यांच्या उपस्थितीत ग्रामसुरक्षा दल (Gram Suraksha Dal) स्थापना करण्यात आले. तसेच कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी ग्रामसुरक्षा दलातील तरुणांना सल्ला देत चांगलीच टोलेबाजी करून हशा पिकवला.
बारामती (पुणे) : आपत्ती काळात ग्राम सुरक्षा दलाचा चांगला हातभार होतो. त्यामुळे पोलिसांनाही (Police) चांगलीच मदत होत असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ग्रामसुरक्षा दल (Gram Suraksha Dal) स्थापना करण्यात आले. तसेच कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांनी ग्रामसुरक्षा दलातील तरुणांना सल्ला देत चांगलीच टोलेबाजी करून हशा पिकवला. याचवेळी त्यांनी ग्रामसुरक्षा दलातील तरुणांना चांगलेच टोले लगावले. ग्राम सुरक्षा दलाचे काय अधिकार आहेत, याची नीट माहिती घ्या. या अधिकारांचा गैरवापर करू नका, नाहीतर कुणाला तरी काठीने बदडून काढाल. परत ते म्हणतील बघा दादा, तुम्ही काठी दिली अन् यांनी आम्हालाच बदडले, असे म्हणताच हशा पिकला.
‘पोलीस भरतीच्या निर्णयाला मंजुरी’
अजित पवार यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे मनोबल वाढावे आणि नावलौकिक कायम राहावा, यासाठी महाविकास आघाडी सरकार कायम पोलिसांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. पोलिसांना चांगली घरे उपलब्ध करून देण्यासह उत्तम पद्धतीची कार्यालये बांधून दिली जात आहेत. त्याचबरोबर पोलीस भरतीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.