बारामती | 25 ऑगस्ट 2023 : अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीत काही तरी शिजतंय अशी चर्चा रंगलेली असतानाच आता त्याला बळ मिळणारं विधान समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय? असा सवाल केला जात आहे.
शरद पवार हे बारामतीत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राजकीय धुरीणांनाही बुचकळ्यात पाडेल असं विधान केलं आहे. अजित पवार आमचे नेते आहेत, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर अजितदादा नेते आहेत. यात वादच नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. लोकशाहीत सभा घ्यायला अडचण नाही. त्याबद्दल चिंता नाही. लोक जाहीर सभा घेऊन भूमिका मांडत असतील तर त्याचा आनंद आहे. त्यामुळे जनतेला कळेल सत्य काय आहे. त्यामुळे कोणीही सभा घेऊन भूमिका मांडत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असं पवार यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे आला आहे. त्याता देशात मोदीच येणार असल्याचं म्हटलं आहे. तर राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी सर्व्हे बघितला नाही. त्याचा बेस माहीत नाही. किती लोकांना विचारलं? आणि कोणत्या लोकांना विचारलं? माहीत नाही. मी जी विविध संस्थांकडून माहिती घेत त्यावरून महाविकास आघाडीलाच सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं कळत आहे, असं ते म्हणाले.
शरद पवार आज सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.सातारा जिल्ह्यातील दहिवडीत सकाळी पवारांची जाहीर सभा होणार आहे. तर संध्याकाळी कोल्हापूरच्या दसरा चौकात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. शरद पवार उद्या सकाळी 10 वाजता कोल्हापूरात पत्रकार परिषद घेतील.