Pune Ajit Pawar : ‘…नाही तर मी अधिकाऱ्यांना खडसावतो, कारण आपण जनतेला बांधील’
दोन वर्षे खूप अडचणीची होती. अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात असतानाही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काढले.
पुणे : दोन वर्षे खूप अडचणीची होती. अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात असतानाही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काढले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या (ZP) विविध विभागात काम करणाऱ्या उत्कृष्ठ अधिकाऱ्यांचा पुरस्काराने (Award) गौरव करण्यात आला, या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमने कितीही लोकाभिमुख काम करायचे ठरवले तरी अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय ते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत. मी अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आणि त्यांनी ती पूर्ण केली नाही तर मी अधिकाऱ्यांना खडसावतो. तो माझा अधिकार आहे. कारण मी जनतेला बांधील आहे, असे ते म्हणाले.
‘चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न’
पुढे ते म्हणाले, की मी लहानपणापासूनच पवार साहेबांच्या कामाची पद्धत पाहत आलो आहे. त्यांनी नेहमी दूरदृष्टी ठेऊन काम केले आहे. तीच गोष्ट माझ्यात आली, मी ते शिकलो. इथे दत्ता मामा भरणे आहेत, जिल्हा परिषदेतून पुढे आलेले कार्यकर्ते आहेत. मी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. कारण त्यांना पुढे आमदार होता यावे. पुणे जिल्ह्यात आपण इंद्रायणी मेडी सिटी जाहीर केली आहे. चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
‘सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करा’
अधिकाऱ्यांवर अन्याय झाला तर जरूर मला सांगा. मात्र तुम्हाला दिलेल्या कामाकडे कानाडोळा केला तर ते मला अजिबात चालणार नाही. तुमच्या भरवशावरच आम्ही राज्याचा गाडा हाकत असतो. सगळ्यांनाच क्रीम पोस्टिंग मिळत नाही. तुम्हीही ग्रामीण भागातून आला असाल. तेव्हा सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करा, असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.