सांगली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी काल पहाटेच्या शपथविधीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर निशाणा साधला होता. आम्ही राष्ट्रवादीशी युती केली तर गद्दारी आणि तुम्ही केली तर काहीच नाही. तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर आज नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडिला मांडी लावून बसले असते, असा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चढवला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. मागे त्याच दिवशी सांगितलेलं आहे. मला ज्या वेळेला वाटेल तेव्हा सांगेल. मला आताच वाटत नाही सांगावं. संपला विषय. मी त्याचवेळी स्टेटमेंट केलं आहे. तुम्ही कितीही घोळून विचारलं तरी जोपर्यंत अजित पवारांच्या मनात येत नाही तोपर्यंत तो बोलणार नाही. आता तो विषय इतका महत्त्वाचा आहे का? अडीच वर्ष झाले पाणी वाहून गेलं. सरकार आलंय. सर्व काम करत आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे सूचक विधान केलं.
महाराष्ट्र मध्ये जे चालेल आहे ते मला पटत नाही. सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो आपण. सरकार येत असतात सरकार जात असतात ताम्रपट कोणीही घेऊन आले नाही. मॅजिक फिगर कोणीही घेऊन आले तर सरकार पडू शकते. खऱ्या अर्थाने आज महागाईचा प्रश्न आहे. पेट्रोल, डिझेल गॅस वाढले आहे. उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सगळ्यांनी मिळून या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे. काही जण माथी भडकवण्याचे काम करत आहेत. भोंग्यावरून जे सुरू आहे. त्यावर ज्यांनी बोलायचे त्यांनी बोलावं. मुख्यमंत्री पण इतके दिवस शांत होते. सर्वांनी जातीपंथांना त्रास होणार नाही असे पाहिले पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री म्हटले होते बोलणार आहे म्हणून. ते बोलले. नसते बोलले तर विरोधक म्हटले असते ते बोलत नाहीत. ते काय बोलले यावर मला काही बोलायचे नाही. त्याबद्दल त्यांना विचारा. मला त्यात काही रस नाही. तुम्हा मला विकासाबद्दल विचारा. आज कोण कोणाला काय म्हटले हीच ब्रेकिंग न्यूज होते. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काही लोक स्वतःचा राजकीय फायदा मिळवण्यासाठी असे मुद्दे घेतात. यंग जनरेशनने यातून काय बोध घ्याचा तो घ्यावा. सर्वच राजकीय लोकांनी याचा विचार करण्याची गरज आहे. त्यांनी पण सरकार चालवले आहे. मी तर छक्के पंजे करत नाही. जे काही असते ते तोंडावर असते. पण काही व्यक्ती विकृतीबद्दल बोलत असतील तर विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावे लागेल. पवार साहेबांची 60 वर्षाच्या राजकारणाची कारकीर्द आहे. पवार साहेब कंबरेखाली वार कधीच करत नाहीत. विकृत बुद्धीचे लोक आहेत. हे दुर्देव आहे महाराष्ट्रचे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.