Ajit Pawar : मीही मराठ्याच्या पोटीच जन्माला आलोय… मराठा आरक्षणावर अजितदादा काय म्हणाले?
राज्याचं हित आणि सर्वसामाम्यांचं कल्याण हेच मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून करतोय. पक्षाच्या विचारांची प्रतारणा होणार नाही. ध्येधोरणांशी तडजोड होणर नाही याची आम्ही काळजी घेतोय. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून राष्ट्रवादीची वाटचाल सुरु राहील.
नाविद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती | 23 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी पुन्हा एकदा 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर आरक्षण आंदोलन अधिकच उग्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. तुमच्याकडे काही पर्याय असतील किंवा चर्चा करायची असेल तर आम्ही कधीही तयार आहोत. मीही मराठ्याच्या पोटीच जन्माला आलोय. आमचा जो गरीब मराठा वर्ग आहे. ज्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही अशा लोकांना आरक्षण द्यावं, या मताचा मी आहे. पण कुणाच्या तरी तोंडातला घास काढून तो दुसऱ्याच्या तोंडात देणं बरं नाही, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार बारामतीत एका कार्यक्रमात बोलत होते. मनोज जरांगे पाटलांनी एक भूमिका घेतलीय. त्यांना ऐकण्यासाठी अनेक तरुण जातायत. आरक्षणाची मागणी करणाऱ्यांबद्दल आम्हाला अजिबात आक्षेप नाही. आम्ही त्यांच्या मागण्या टाळतोय असं नाही. आजपर्यंत ज्यांना आरक्षणाची मदत झाली त्या वर्गाला धक्का बसू न देता आरक्षण दिले पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे. वेळ मारुन नेण्याचा माझा स्वभाव नाही. जे करायचंय ते शक्य असेल तर वाटेल ती किंमत मोजून मी करणारच, असं अजित पवार म्हणाले.
आम्हीही आरक्षण दिलं
आम्ही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिलं. पण ते टिकलं नाही. नंतर फडणवीस यांनीही प्रयत्न केला. पण तेही टिकलं नाही. आता धनगर समाजही मागणी करतोय. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणावर सर्वपक्षीय आणि सर्व संघटनांची बैठक घेतली. त्यात पूर्वीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं असं सगळ्यांनी सांगितलं. जरांगे पाटील म्हणतात छाताडावर बसून आरक्षण मिळवू. त्यांनी मुदत दिलीय. शिंदे समितीला यावर अभ्यास करायला सांगितलंय. धनगर समाजालाही आरक्षण हवंय. विविध ठिकाणी सभा होतायत. जालन्यात प्रचंड मोठी सभा झालीय, असं अजित पवार म्हणाले.
ध चा मा करू नका
52 टक्के आरक्षण आपण वेगवेगळ्या घटकांना दिलं आहे. आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण दिलेलं आहे. मध्ये काहींनी वातावरण खराब केलं. कंत्राटी भरतीचा विषय आणला. पण फडणवीसानी पत्रकार परिषदेत पुरावा दिला आणि हा आदेश रद्द केला. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मrडीयाला विनंती… मी माझी मते स्पष्ट सांगत असतो. उगाच ध चा मा करु नका. आम्ही घाई गडबडीत निर्णय घेतला आणि ते आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा तुम्हीच बोलणार. त्यामुळं टिकणारं आरक्षण देण्याचा आमचा मानस आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मी सरकारमध्ये नसतो तर…
मी आता सरकारमध्ये नसतो तर आपल्या पाण्याची वाटच लागली असती उपमुख्यमंत्री-पालकमंत्री म्हणून आपल्याला काही गोष्टी मिळतात. पूर्वी आपल्या वाट्याचं पाणी गेलंच होतं. पण उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर आम्ही निर्णय घेवून पाण्याची सोय केली. अलिकडच्या काळात काही निर्णय घेतलेत. कुठल्याही स्थितीत आपल्या राज्याचा आणि तालुक्याचा विकास झाला पाहिजे. आम्ही सगळे विविध भागाचं आणि जातीधर्माचं प्रतिनिधीत्व करतो, असं त्यांनी सांगितलं.
फक्त विरोधी पक्षात बसून चालणार नाही
भाजपबरोबर जायचं ठरलं होतं. मी अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. विरोधी पक्षात बसून केवळ आंदोलनं करुन चालत नाही. राज्यातलं वातावरण सध्या वेगळं झालंय. भाजपसोबत असलो तरी पक्ष आपल्या विचारसरणीनंच काम करेल. राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.