Ajit Pawar | अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अजित पवार गेल्या 32 वर्षांपासून बँँकेचे संचालक होते. पण त्यांनी आता अचानक संचालक पदाचा राजीनामा दिलाय.
पुणे | 10 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे अजित पवार गेल्या 32 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते. अजित पवार 1991 पासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते. बँक राज्यात नंबर वनला आणण्याचं काम अजित पवारांनी केलं. पण त्यांनी आज अचानक पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. जिल्हा बँँकेच्या अध्यक्षांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय.
अजित पवार जिल्हा बँकेच्या प्रत्येक पंचावार्षिक निवडणुकीत सहभागी व्हायचे. पण त्यांनी आता आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांनीदेखील याबाबत माहिती दिलीय. त्यांनी याबाबतचं पत्रक देखील काढलं आहे. अजित पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असला तरी अजित पवार यांचं मार्गदर्शन घेऊ, असं बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांनी सांगितलं आहे.
अजित पवार यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा का दिला?
अजित पवार यांनी अचानक बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा का दिला? याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय. पण यामागील खरं कारण समोर आलंय. “उपमुख्यमंत्रीपदाचा वाढता व्याप आणि पक्षाची वाढती जबाबदारी लक्षात घेता अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय”, अशी माहिती समोर आलीय. अजित पवार हे याआधी चारवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. तसेच त्यांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. पण तरीही त्यांनी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला नव्हता. मग अचानक का त्यांनी राजीनामा दिला? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार एका गटाने नेतृत्व करत आहेत. ते पक्षाचे प्रमुख असल्याचा त्यांच्या गटाचा दावा करण्यात येतोय. आता याप्रकरणी निवडणूक आयोगातही सुनावणी सुरु झालीय. तसेच सुप्रीम कोर्टातही याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या कामाचा व्याप वाढला आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. ते त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे ओळखले जातात. प्रशासनात कुठेही दिरंगाई किंवा कमतरता दिसली तर अधिकाऱ्यांना धारेवर धरतात.